इ जनसुनवणीत आमदार नितेश राणे यांनी मांडल्या हरकती
देवगड – जामसंडे नगरपंचायत हद्दीत सीआरझेड ३ नको
तालुकानिहाय फेर जनसुनावणी घ्या
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या समुद्र किनारपट्टीचा विचार करता सीआरझेड च्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हयाचा स्पेशल केस म्हणून विचार केला पाहिजे. किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव, किनारपट्टीवर राहणारे लोक, यांचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर किनारपट्टीवरील नियम-कायदे आणि सीआरझेड वेगळ्या दृष्टिकोनातून तयार करावा. आजची इ जनसुनावणी गोंधळलेली, नेटवर्क, आवाज नसलेली होती. त्यामुळे जनतेला आपले म्हणणे मांडता आले नाही. सीआरझेड ची ही जनसुनावणी प्रत्येक तालुक्यात जाऊन स्वतंत्र घेण्यात यावी, जेणेकरून प्रत्येकाला आपले म्हणणे मांडता येईल अशी हरकत भाजपा आमदार नितेश राणे यांनी इ जनसुनावणीत मांडली.
सीआरझेड इ जनसुनावणी ओरोस येथे झाली. त्यात भाजपा आमदार नितेश राणे ऑनलाईन सहभागी झाले होते. या जनसुनावणी वर हरकत घेतांना आमदार नितेश राणे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. इ जनसुनावणी च्या आधारे सीआरझेड निश्चित करता येणार नाही. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र सुनावणी घ्या. जेणेकरून तेथील जनतेला आपले म्हणणे स्पष्टपणे मांडता येईल.
सीआरझेड ३, मध्ये देवगड -जामसंडे नगरपंचायत सारखी आस्थापना येतात त्यामुळे भविष्यात या सीआरझेड कायद्यामुळे या नगरपंचायतचा विकास थांबू शकतो किंवा मर्यादित होऊ शकतो. याचा विचार करून देवगड- जामसंडे शहरांचा विचार करून सीआरझेड २, चा नियम लावला जावा तरच या नगरपंचायतला जनतेच्या विकासासाठी फायदा होईल. असे मुद्दे आमदार नितेश राणे यांनी इ जनसुनावणीत मांडले.