दोडामार्ग / सुमित दळवी :
कोकणची संस्कृती हिच इथे पर्यटन वाढवण्यासाठी ताकद आहे. तिचा प्रभावी वापर आणि सकारात्मक प्रयत्न केले तर इथला पर्यटन विकास कोणी रोखू शकणार नाही, असे मत कोकणी रानमाणूस या नावाने पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणारे प्रसाद गावडे यांनी कुंब्रल येथे व्यक्त केले.
सप्तधारा पर्यटन सेवा सहकारी संस्थेतर्फे आयोजित जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई तर व्यासपीठावर कुंब्रल सरपंच प्रवीण परब, जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, माजी पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, माजी उपसभापती बाबी बोर्डेकर, नंदू गावकर, संस्थेचे अध्यक्ष ल. वि. सावंत आदी होते.
श्री. गावडे म्हणाले, “कोकणात प्रचंड क्षमता आहेत. विशेषतः सह्याद्रीच्या समृध्द आणि संवेदनशील क्षेत्रात वसलेल्या दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात जगात दुर्मिळ ठरेल असे पर्यावरण आणि उच्च प्रतिची संस्कृती आहे. याचा वापर पर्यटनात व्हायला हवा तसे झाले तर आपली कोणी स्पर्धाच करू शकत नाही. सकारात्मक प्रयत्नांमधून इथे खूप चांगल्या पध्दतीने पर्यटन उभे राहू शकतो. यात हवी ती मदत करण्याची आमची तयारी आहे.”
श्री. देसाई म्हणाले, “कोरोनामुळे उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला आहे. मात्र, यातून या क्षेत्रात नव्या संधीही उपलब्ध होतील. पर्यटन यात आघाडीवर असेल. ही या सह्याद्रीच्या रांगामध्ये पर्यटन उभे करण्याची योग्य वेळ आहे. सरकार करणार या मानसिकतेत न राहता आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा. दोडामार्ग तालुक्यात असलेला निसर्ग ही इथली ताकद आहे. त्याचा वापर केला तर या भागात पर्यटन वाढीबरोबरच खूप मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होईल.”
प्रास्ताविकात ल. वि. सावंत यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत पर्यटन वृध्दीसाठी सुरू असलेले प्रयत्न विषद केले. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष देसाई यांनी कृषी पर्यटनाला असलेल्या संधी सांगत या भागात त्याचा कसा वापर करता येईल हे सांगितले. श्री. गवस यांनी सकारात्मक मानसिकता घेवून पुढे जाण्याचे आवाहन केले. श्री. परब यांनी आता कोरोनामुळे कृषी क्षेत्राला महत्त्व आले असल्याचे सांगत याला पर्यटनाची जोड देण्याचे आवाहन केले. श्री. बोर्डेकर यांनीही मार्गदर्शन केले.