श्री देव वेतोबा वाळू व्यावसायिक असोसिएशनने जिल्हाधिकारी यांचे वेधले लक्ष
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोचेमाड खाडी क्षेत्रात वाळू लिलाव जाहीर करावा, अशा आशयाचे निवेदन आरवली येथील श्री देव वेतोबा वाळू व्यावसायिक असोसिएशनने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. दरम्यान, शासनाचे वाळू लिलाव बाबत मोचेमाड खाडीत काही धोरण जाहीर झाल्यास संस्थेस कळवावे व प्राधान्य द्यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
श्री देव वेतोबा वाळू व्यावसायिक असोसिएशन संस्था आरवली टाक येथील मोचेमाड खाडी क्षेत्रात कार्यरत आहे.संस्थेचे सर्व सभासद हे स्थानिक रहिवासी आहेत. मोचेमाड खाडीत चालू असलेल्या हातपाटी द्वारे वाळू काढण्याच्या कामात संस्थेचे सभासद आहेत, त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होता. परंतु कित्येक वर्ष वाळू लिलाव जाहीर झाला नाही, २०१७-१८ मध्ये जाहीर झालेला लिलाव सुद्धा काही कारणांमुळे बंद पडला, त्यामुळे लाखो रुपये गुंतवून व्यावसायिकांचे नुकसान झाले. व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाखो रुपयांच्या वाळू नौका बंदरावर उभ्या पडून सडत आहेत याकडेही संस्थेने जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.