*जागतिक साहित्य कला व्यक्तींत्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ रेखा कुलकर्णी यांची अप्रतिम अष्टाक्षरी अलंकार काव्यमाला*
*’ चुडामणी ‘*
करी प्रत्येक ललना
सोळा शृंगार साजरा,
केश श्रृंगार करता
दिसे चेहरा गोजिरा
कधी वेणी पाठीवर,
कधी मानअंबाड्याला.
त्याचे सौंदर्य वाढवी,
चुडामणी माळलेला.
मोती, पाचु, नी माणिक,
गुंफुनिया सोनतारी.
घडविला सराफाने,
चुडामणी लयी भारी.
सौभाग्याचा असे साज,
काळ्या कुंतली शोभतो.
पाठमोरी पाहताना,
सखा भान हरपतो.
गोल खड्याच्या भोवती,
मुके घुंगरू गुंफिले.
सैल अंबाडा होताना,
गुज कुणा ना कळाले.
एक चुडामणी मी ही,
आहे जपून ठेवला.
सूनमुख पाहताना,
सासु बाईंनी दिलेला.
जेव्हा नेसते पातळ,
नऊवारी सणावारी.
चुडामणी माळते मी,
सुखावते खाशी स्वारी.
रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड पुणे
सर्व हक्क स्वाधीन
८/९/२०