अपयशालाच ‘टर्निंग पॉइंट’ बनवून आपले उचित ध्येय साधावे – श्री. सत्यवान रेडकर
“विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अपयश आले तर खचून न जाता अपयशालाच आपला ‘टर्निंग पॉइंट’ समजून आपले उचित ध्येय साधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असे भावपूर्ण उद्गार मुंबई सीमाशुल्क या विभागात कार्यरत कनिष्ठ अनुवाद अधिकारी, श्री. सत्यवान रेडकर यांनी खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय, ज्युनिअर कॉलेज व महाविद्यालय खारेपाटण आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना काढले.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटणच्या कै. चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, खारेपाटण हायस्कुलचे पर्यवेक्षक संजय सानप, समन्वयक प्रा. सुबोध देसाई आदी पदाधिकारी, शालेय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
“तिमिरातून तेजाकडे” या आपल्या शैक्षणीक चळवळी द्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेविषयी निशुल्क मार्गदर्शन करणारे व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार या विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी या पदावर कार्यरत असलेले सिधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र श्री. सत्यवान रेडकर यांनी खारेपाटण येथील आपल्या व्याख्यानात विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध संधी तसेच स्पर्धेची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी, याबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका आरती मांगले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे पर्यवेक्षक संजय सानप यांनी केले. या कार्यक्रमाचे समन्वयक सुबोध देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.