*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या लेखिका कवयित्री सौ.रेखा कुलकर्णी यांनी सादर केलेली अष्टाक्षरी अलंकार काव्यमाला*
*’चंद्रहार ‘*
सात पाच किंवा तीन,
असे पदर हाराला.
अलंकार चंद्रहार,
शोभे श्रीमंती थाटाला.
कड्या सोन्याच्या गुंफणी,
छान घडतो हा हार.
जशी गुंफते नात्यांना,
नार प्रेमे अलवार.
गळा घालताच येतो.
याला चंद्राचा आकार.
म्हणूनच नाव याचे,
पडले ग चंद्रहार.
चंद्रकोरीचे पदक,
मध्यभागी लटकते.
शोभा मंगळसूत्राची,
जरा आणखी वाढते.
चंद्रमुखी लावण्याची,
कांती किती उजळतो.
स्वर्ण तेजाने हाराच्या,
मुखचंद्र तेजाळतो.
चंद्रहाराच्या साक्षीने,
लाजाहोम, सप्तपदी.
हात घेतला हातात,
आता सुटू नये कधी.
रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड पुणे
सर्व हक्क स्वाधीन
१७/९/२०