कुडाळ :
“सामाजिक बांधिलकी मानणारे सभ्य व सुसंस्कृत राजकारणी म्हणजे एकनाथ ठाकूर होय. गरीबी प्रगतीच्या आड येऊ शकत नाही याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एकनाथजी ठाकूर होय.” असे उद्गार प्रा.अरुण मर्गज यांनी काढले .ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एकनाथजी ठाकूर जयंतीनिमित्त आयोजित श्रद्धांजलीच्या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “प्रखर बुद्धिमत्ता, प्रबळ इच्छाशक्ती असेल आणि नीतिमूल्यांवर प्रगाढ श्रद्धा असेल तर पद, प्रसिद्धी व सन्मान यांची कधी वाणवा पडत नाही. याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे एकनाथजी ठाकूर होय. मराठी माणसांना बँकिंग सेवेची दालनं खुली करण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग ची स्थापना केली व लाखो तरुणांना सुस्थीर कौटुंबिक आयुष्य बहाल केले. त्याच बरोबरच सारस्वत बँकेमार्फत नागरी सहकारी बँक क्षेत्रांमध्ये भारतामध्ये एक नंबर ची बँक म्हणून आदर्शभूत दबदबा निर्माण केला. तसेच शैक्षणिक, सामाजिक, साहित्य विषयक कार्यक्रमासाठी मदत करताना प्रसिद्धीप्रमुख राहून कधी हात आखडता घेतला नाही.अशा महान नेत्यांचे आदर्श समोर ठेवून बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था वाटचाल करीत आहे. यांचे श्रेय उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकार्यांना आहे. असे सांगत त्यांनी एकनाथजी ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या शुभांगी लोकरे व विविध अभ्यासक्रमाची प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.