You are currently viewing जगामध्ये दुःख का ?

जगामध्ये दुःख का ?

 

जीवनविद्येला असं आढळून आलं की, *माणसाला जे दु:ख प्राप्त होतं त्याचं कारण त्याला जे करायला पाहिजे ते तो करत नाही. उलट जे करायला पाहिजे त्याच्या नेमकं उलट तो करत असतो आणि त्यामुळे त्याला दु:ख प्राप्त होते.*

प्रत्येक माणसाला आनंद पाहिजे, सुख, शांती, समाधान पाहिजे. आता प्रत्येक माणसाला जर पाहिजे आहे तर हे शांती, सुख, समाधान *नेमकं आहे कुठे, ते त्याला पहिलं समजलं पाहिजे.* ते आहे आपल्याचकडे. वास्तविक, *आपल्याकडे जे आहे तेच आपण शोधतो आहोत हेच दुःखाचं कारण आहे, हे पहिलं कळलं पाहिजे.* जे आपल्याकडे आहे तेच आपण शोधतो, त्यासाठी आपण धडपड करतो, खटपट करतो, लटपट करतो, श्रम करतो, कष्ट करतो त्यावेळेला आपलं दुःख वाढत जातं.

म्हणून याच्यासाठी पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जीवनामध्ये मला काय पाहिजे?

सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे. मग ते कुठे आहे? माझ्याच जवळ आहे.

*माझ्याच जवळ आहे म्हटल्यानंतर शोधायचं काही कारणच नाही तरी आम्ही शोधतो.*

आता तुम्ही म्हणाल, प्रपंचामध्ये आम्हाला नोकरी-धंदा करायला लागतो. कष्ट करायला लागतात. *त्याचं काय? ते करायलाच पाहिजे. कारण तुम्ही जन्माला आल्यानंतर पोट भरण्यासाठी कष्ट केले पाहिजे हा “निसर्गाचा संकेत आहे, ईश्वरी संकेत आहे” हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे.* हा संकेत किंवा हा नियम तुम्ही मोडाल तर तुम्ही मोडले जाल. निसर्गनियम काही मोडता येणार नाहीत, कारण पोट देवाने दिलेलं आहे, ते तुम्ही काम करावं म्हणून, काम कशासाठी करायचं? *जगाचं रहाटगाडगं जे आहे ते व्यवस्थित चालावं म्हणून प्रत्येक माणसाने काम हे केलंच पाहिजे, कारण तो ईश्वरी संकेत आहे.* म्हणून पोट दिलं आहे देवानी ते काम करण्यासाठी.

*आणखी देवाने काय व्यवस्था केली आहे?*

पोट भरण्यासाठी निरनिराळी माणसं जी आहेत त्यांची निरनिराळ्या तऱ्हेची प्रकृती, निरनिराळ्या तऱ्हेची आवड आणि निरनिराळ्या प्रकारचं कर्तृत्व असं तुम्हाला दिसेल. *हा एक व्यवस्थेचा भाग आहे. कारण सगळी माणसं जर एकच काम करायला लागली तर जगाचं रहाटगाडगं चालणार नाही.* काही मंडळीनी झाडू मारायची, काही मंडळींनी सतरंजी घालायची, काही मंडळींनी बॅनर्स लावायचे, काहींनी प्रवचन करायचे, काहींनी भजन करायचं, काही मंडळींनी पेटी वाजवायची, कोणी तबला वाजवायचा, कोणी पखवाज वाजवायचा अशी निरनिराळ्या मंडळींनी निरनिराळी कार्य करायची.

एक शास्त्रज्ञ एकच गोष्ट करतो ? तर निरनिराळे शास्त्रज्ञ निरनिराळ्या गोष्टी करत असतात. वीजेची उपकरणं हाताळणारे लोक वेगळे, सोनार वेगळं काम करतो, लोहार वेगळं काम करतो, सुतार वेगळं काम करतो, कोळी वेगळं काम करतो, साळी वेगळं काम करतो. *ही जी निरनिराळ्या प्रकारची माणसं आहेत ह्यांच्या आवडी वेगवेगळ्या आहेत, त्यांचं कर्तृत्व वेगवेगळं आहे* आणि *त्याच्यातून ह्या जगाचं रहाटगाडगं चालत असतं. म्हणजे ही एक सुंदर व्यवस्था आहे. ह्याच्यामध्ये कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही हे लक्षात घ्यायचं.*

आपण आपलं कर्तव्य बजावत असताना ते कुठलंही कर्तव्य म्हणजे काम असू दे, ते श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा विचार मनात आणायचा नाही.

*ते काम करणं हे महत्त्वाचं आहे आणि ते काम जितकं तुम्ही प्रामाणिकपणे, आवडीने, गोडीने कराल तितका देव तुमच्यावर प्रसन्न होणार आहे, हे पहिलं लक्षात ठेवा.*

 

 

*- सद्गुरू श्री. वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा