जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना
रुसशी कां रे नन्द किशोरा सोडी आतां रुसवा
बाई बाई डाव तुझा फसवा
ऐन दुपारी यमुना तीरी
पाहून मज एकटी बावरी
भुलविण्यास परी धरीशी कां रे अधरी तू पावा
बाई बाई डाव तुझा फसवा
येता जाता पाण्यावरती
लपुन पाहसी अवती भवती
लाज आणीशी न्याहाळून जणु छेडीसी मारवा
बाई बाई डाव तुझा फसवा
नाते आपुले युगा यु्गांचे
विसरून जाते विसरायाचे
शहारते मग तनुलता ही छेडू नको माधवा
बाई बाई डाव तुझा फसवा
घट डोईवर नजर तुझ्यावर
तोही पाझरे अंतरी पाझर
जना न कळतिल भाव मनीचे करतील रे कांगावा
बाई बाई डाव तुझा फसवा
अरविंद
9/2/22