प्रा.दिलीप सुतार, कुरुंदवाड यांनी लतादीदींच्या आठवणी जागृत करणारी शब्द फुले वाहिलेली शब्दसुमनांजली…
*नाम गुम जाएगा…*
*चेहरा ये बदल जाएगा…*
*मेरी आवाज ही पहचान है…*
*गर याद रहे…!*
हा …
सप्तसूरातील ‘षड्ज’
मुरलीधराच्या बासरीचे
अवीट माधूर्य घेऊन
पृथ्वीतलावर अवतरतो….
अन् कोट्यावधी स्वप्नील मनांवर
प्रेमीयुगुलांच्या भावविश्वावर…
‘गुलजार’ मोरपीस फिरवून जातो…
कुठून एक ‘ऋषभ’
रक्तीम निरव पहाटेच्या
दवांत भिजलेल्या…
पारिजातकां सारखा उमलून येतो…
अन् ‘तो’ असो की ‘ती’
गरीब असो की श्रीमंत
राजा असो की रंक…
सर्वांच्याचअंतरिच्या दु:खांना
कस्तुरीचा सुगंध
प्रदान करून जातो…
कुठून एक ‘गंधार’…
अवखळं.. निर्मळ झ-यासारखा
गुणगुणत …
आपल्या सोबत
सहाऋतूंंची कृतज्ञता..
फुलांच्या गंधकोषातली
कोमलता …अन्
मोनालिसाच्या गूढ हास्याची सुंदरता ही घेऊन येतो…
आणि
लिलया…
मानवी जीवनाचा
अर्थ ही सांगून जातो…
कुठून एक ‘मध्यम’…
मनाच्या उंबरठ्यावर
लहान मुलासारखा ठाण मांडून बसतो…
निरव मौनी क्षणांना
अलवार तारुण्य सुलभ प्रीतीची चाहूल देऊन जातो…
विरही… राधेच्या….
अलौकिक प्रीतीला…
विदेही मीरेच्या…
अलौकिक कृष्ण भक्तीला…
साता समुद्रापार पोहचवितो…
कुठून एक ‘पंचम’…
फुलपाखरू होऊन येतो…
अन्…
हिर -रांजा…
सोहनी -महिवाल
शिरी -फरहाद
लैला- मजनू च्या रूधिरातली
अव्यक्त प्रेम भावनांची मेहंदी
आपल्या मन:पटलावर
रेखाटून जातो…
कुठून एक ‘धैवत.’..
‘माऊली’चा प्रेमळ जादूई
स्पर्श बनून येतो…
थकल्या भागल्या जीवाना
सावली अभंग ओव्यांची देतो…
आंधळ्याना डोळे…
अन् देतो पांगळ्याना पाय…
वाट चुकल्या लेकरांना
भेटवितो विठू माय…
*ईश्वर सत्य है…*
*सत्य ही शिव है*
*शिव ही सुंदर है…*
म्हणत..म्हणत
कुठून एक दैवदत्त ‘निशाद’…
एक अभिषेकी- मंगेशी सुस्वर
आपल्या ध्यानी-मनी -कानी
रूजून येतो…अन्…
शिवालयाच्या निरव शांत
गर्भागाराची प्रचिती देत… शालिन..अभिजात
संगीत तपश्चर्येची
भारतीय संस्कृतीची…
समस्त विश्वालाच
भूरळ घालून जातो…
मृन्मयी मातीला…
नक्षत्रांशी जोडत…
‘लता’ नावाच्या गानकोकिळेला
असंख्य रसिकांच्या ह्रदयस्त
प्रीतीचे पंख देऊन…
‘अजरामर देवत्व’ प्रदान करून जातो…!!!
प्रा.दिलीप सुतार
कुरूंदवाड
मो.नं9552916501