You are currently viewing वैभववाडी येथे ‘राष्ट्रीय प्रवासी दिन’ साजरा.

वैभववाडी येथे ‘राष्ट्रीय प्रवासी दिन’ साजरा.

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज वैभववाडी येथे ‘राष्ट्रीय प्रवासी दिन’ साजरा करण्यात आला. सुरुवातीला ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा.श्री.एस.एन. पाटील, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. तेजस साळुंके, ग्राहक चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.शैलेंद्रकुमार परब, सांगुळवाडी बीटेक कॉलेजचे प्राचार्य श्री.चेतन वाडेकर, ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते श्री. सचिन सावंत व श्री. प्रशांत कुळये आदी मान्यंवर उपस्थित होते.
‘रथसप्तमी’ हा दिवस ‘राष्ट्रीय प्रवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांनी १९८९ साली रथसप्तमी या दिवशी ‘महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघा’ची स्थापना केली. इतर ग्राहकांप्रमाणेच प्रवासी हा सुद्धा एक ग्राहकच आहे. त्याच्या हक्क अधिकाराची जाणीव करून देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ या संस्थेची स्थापना केली. प्रवासी ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने आवाज उठवला पाहिजे. तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचारी संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने एसटी चालू करा अन्यथा पर्यायी व्यवस्था निर्माण करा अशी मागणी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे व परिवहनमंत्री मा.अनिल परब यांच्याकडे करणार असल्याचे प्रा.श्री.एस.एन. पाटील यांनी सांगितले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ या दोन संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रभर ग्राहक आणि प्रवासी ग्राहक यांच्या प्रबोधनाचे व जागृतीचे महान कार्य सुरू आहे. या संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना न्याय मिळवून देताना आनंद मिळतो असे आपल्या मनोगतात श्री.शैलेंद्रकुमार परब यांनी सांगितले. प्रवासी ग्राहकांनी जागृत राहून व्यवहार केल्यास फसवणूक होण्याचा धोका कमी असतो. त्यातूनही प्रवासी ग्राहकाची फसवणूक झाल्यास संस्थेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे जिल्हा अध्यक्ष श्री तेजस साळुंके यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.तेजस साळुंखे यांनी केले तर श्री. सचिन सावंत यांनी सर्वांचे आभार मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा