You are currently viewing फ्रान्सकडून भारताला आणखी ५ राफेल विमाने, ऑक्टोबरमध्ये हवाई दलात दाखल होणार…..

फ्रान्सकडून भारताला आणखी ५ राफेल विमाने, ऑक्टोबरमध्ये हवाई दलात दाखल होणार…..

पॅरिस:

फ्रान्सने ५ राफेल लढाऊ विमानांची अजून एक तुकडी भारताकडे सोपवली आहे. हि ५ राफेल लढाऊ विमानं सध्या फ्रान्समध्येच असून ऑक्टोबर महिन्यात ती भारतात दाखल होतील, असं सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील कलईकुंडा हवाई दलाच्या तलावर या विमानांना तैनात केलं जाणार आहे. ही विमान चीनला लागून असलेल्या पूर्वेकडील सीमेचं संरक्षण करतील. १० सप्टेंबरला एका औपचारिक कार्यक्रमात भारतीय हवाई दलात या आधीची राफेलची पहिल्या तुकडीतील ५ विमानं दाखल झाली आहेत.

फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले आहे कि, ‘राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारताला सोपवण्यात आली आहे. ही विमानं सध्या फ्रान्समध्ये आहेत. ही विमानं भारतात कधी आणायची ते आता भारतीय हवाई दलावर अवलंबून आहे. भारतीय हवाई दलाचे पायलट हे उत्कृष्ट आहेत’.

भारत-चीनमधील वाढत्या तणावग्रस्त पार्श्वभूमीवर या विमानांचे भारताने आपल्या दृष्टीने काही बदल केले आहेत. त्यामुळे हे विमान कमी तापमानातसुद्धा सहजपणे सुरू होऊ शकते. पहिल्या तुकडीत भारतात दाखल झालेल्या ५ राफेल विमानांची २५० तासांहून अधिक उड्डाणं आणि फिल्ड फायरिंगच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अंबाला येथील १७ गोल्डन अ‍ॅरो पथकांमध्ये या विमानांचा समावेश करण्यात आला आहे.

‘चीनच्या चेंगदू जे -२०’ आणि ‘पाकिस्तानच्या जेएफ -१७’ लढाऊ विमानांची तुलना सध्या भारताच्या राफेलशी होत असली तरी, हि दोन्ही विमानं राफेलच्या तुलनेत काही पावले मागे आहेत. चिनी जे – २०विमान रोल स्टील्थ फायटर आहे. तर राफेल विमानांचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जाऊ शकतो. जे – २० ची बेसिक रेंज १,२०० किमी आहे. जी २,७०० किमी पर्यंत वाढवली जाऊ शकते. जे – २० ची लांबी २०.३ मीटर ते २०.५ मीटर पर्यंत आहे. त्याची उंची ४.४५ मीटर आणि पंखांची लांबी १२.८८-१३.५० मीटर दरम्यान आहे. अर्थात ती राफेलपेक्षा खूपच मोठी आहे. चीनने पाकिस्तानच्या जेएफ – १७ मध्ये पीएफ – १५ क्षेपणास्त्रांची जोडणी केली आहेत. पण तरी ती राफेलपेक्षा कमकुवत आहे.

भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमानं खरेदीचा करार केला आहे. ३६ पैकी ३० विमानं लढाऊ असतील. तर ६ प्रशिक्षण विमानं असतील. प्रशिक्षण विमानात दोन सीट असतील आणि त्यामध्ये लढाऊ विमानांमध्ये असलेली जवळजवळ सर्व वैशिष्ट्ये असतील. रशियाकडून सुखोई विमानं खरेदी केल्यानंतर जवळपास २३ वर्षांनी भारताने प्रथमच राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहे. ही राफेल विमानं प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. राफेल विमानांवर मिटीओर, मिका आणि स्काल्प ही क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा