कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “स्नेहांश इंटरटेनमेंट आणि चिमणी पाखरं डान्स अकॅडमी” यांच्या संयुक्त निर्मितीमधून साकारलेले झुलबी, माली, टाईम प्लिज यासारख्या लघुचित्रपटांमधून मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल स्पर्धेत बहुमान मिळविणाऱ्या दिक्षा नाईक, साहिल सातार्डेकर, दिव्या धामणेकर आणि वेदांत वेंगुर्लेकर या बालकलाकारांचा मनसेच्यावतीने शाल, श्रीफळ व श्री देव रवळनाथ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
‘स्नेहांश एन्टरटेन्मेंट’च्या झुलबी शॉर्टफिल्ममधील दिक्षा नाईक हिला सलग दोनवेळा इंटरनॅशनल लेव्हलवर बेस्ट एक्टरेसचा बहुमान मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये तिने दुसऱ्यांदा बेस्ट एक्टरेसचा ‘किताब पटकावला आहे. तर “माली” या शॉर्टफिल्मलादेखील सर्वोत्कृष्ट मालवणी शॉर्टफिल्म अवॉर्ड मिळाला आहे. साईल सातार्डेकर याला उत्कृष्ट सहाय्यक बालकलाकार हा अवॉर्ड मिळाला आहे. जिल्हावासियांची मान अभिमानाने उंचावणारी ही गोष्ट असून या बालकलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याने त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
पिंगुळी-धुरीटेंबनगर येथे आयोजित या कार्यक्रमात पुणे येथे पार पडलेल्या अडथळा शर्यत स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणाऱ्या अनुष्का गावडे यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी, मनसे उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष गुरू मर्गज, विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर, शाखाध्यक्ष वैभव धुरी, तुषार धुरी व पिंगुळी ग्रामपंचायत सदस्या उदया धुरी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन दिपक गावडे यांनी, तर आभार वैभव धुरी यांनी मानले.