निकृष्ट दर्जाच्या कामांकडे केसरकर लक्ष देतील का?
सावंतवाडी मतदारसंघातील रस्त्यांसाठी अनेकवेळा ग्रामस्थांनी आवाज उठवला होता. सावंतवाडी – मळेवाड, बांदा- दोडामार्ग रस्त्यांसाठी उपोषणे, अधिकाऱ्यांना घेराव घालणे, आंदोलने आदी घटना घडल्या होत्या. तद्नंतर सावंतवाडी मळेवाड व बांदा दोडामार्ग सह आंतरस्त्यांची कामे जोरात सुरू झाली, त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले होते.
सावंतवाडी मळेवाड मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून
आज दिनांक ४ डिसेंबर रोजी रात्रीच्या अंधारातच गाड्यांच्या दिव्यांच्या प्रकाशात डाम्बरीकरणाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले असून रात्रीच्या वेळी काम सुरू असल्याने ग्रामस्थांनी सदर कामांकडे संवाद मीडियाचे लक्ष वेधले. दोडामार्ग तालुक्यातील कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा अलीकडेच पर्दाफाश झाला होता, त्यामुळे दीपक केसरकरांच्या मतदारसंघात रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे समोर येत आहे. दीपक केसरकर विकासात्मक कामांसाठी निधी आणतात, कामे मंजूर होतात परंतु अशाप्रकारे रात्रीच्या अंधारातच डाम्बर फासून मक्तेदार मोकळे होत असल्याने कामांचा दर्जा घसरत आहे. दीपक केसरकरांनी स्वतःच्या मतदारसंघात होत असलेल्या कामांकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे, अन्यथा पुन्हा एकदा रस्ते तयार होतील आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी मध्ये वाहूनही जातील.