मुंबई :
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापुर, महाराष्ट्रात झाला. ‘आनंद’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 1956 साली रमेश देव यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर आरती हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी पैशाचा पाऊस आणि भाग्यलक्ष्मी या चित्रपटांत काम केले.
रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री सीमा देव यांच्यासोबत लग्न केले. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले.