You are currently viewing अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून दिला तहसीलदारांच्या ताब्यात..

अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून दिला तहसीलदारांच्या ताब्यात..

*कुडाळ तालुका डंपर संघटनेने जाब विचारताच सोडला डंपर?*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणारा अनधिकृत वाळू उपसा आणि शासनाचा बुडणारा महसूल याबाबत यापूर्वीच संवाद मीडियाने आवाज उठवलेला होता. काल रात्री अशाचप्रकारे अनधिकृत रित्या वाळू वाहतूक करणारा देसाई नामक व्यक्तीच्या मालकीचा डंपर सुजाण नागरिकांनी पकडून तहसीलदारांना पाचारण करून त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

बांदा येथील कारवाईची माहिती संघटनेच्या फिरत्या नेटवर्क मुळे तात्काळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समजली. बांदा येथे डंपर पकडल्याने काहींनी तात्काळ खामदेव नाका इन्सुली येथे जमण्याचे ठरविले. संघटनेच्या सदस्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार ताबडतोब डंपर संघटनेचे पदाधिकारी रंगीला धाबा येथे जमले. वाळूचा डंपर पकडल्याने संतप्त झालेल्या संघटनेच्या पदाधिकारी डंपर मालकांनी तहसीलदारांना जाब विचारला. त्यामुळे तहसीलदार ऑफिसमध्ये अनधिकृत वाहतूक केली म्हणून ताब्यात घेतलेली गाडी कोणताही दंड न आकारता सोडून देण्याचे संघटना आणि तहसीलदार यांच्यात झालेल्या बैठकीत ठरल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

काल रात्री घडलेल्या प्रकारामुळे एका डंपर मालकाच्या गाडीवर कारवाई होताच तात्काळ सर्व डंपर मालक घटनास्थळी पोचल्याचे दिसून आले. डंपर मालकांच्या एकजुटीमुळे पकडलेला डंपर देखील सुटणार असल्याने हा संघटनेचा विजय असल्याचेही म्हटले असून आलेल्या सर्व डंपर मालकांचे आभार मानले आहेत. अनधिकृत वाळू वाहतूकदारांची एक साखळी असून रस्त्यात कुठे अडचणी असल्यास एक दुसऱ्याला तशा सूचना केल्या जातात, त्यानंतरच रस्ता मोकळा, निर्धोक असला तर गाड्या सोडल्या जातात, आणि तरीही गाडी पकडली तर संघटना एक होऊन जाब विचारते. शासनाचे अधिकारी अशावेळी गाड्या सोडून देतात, आणि सरकारचा महसूल बुडतो. शासनाने लवकरात लवकर वाळू पट्टा लिलाव करून अधिकृतपणे वाळू उपशाला परवानगी द्यावी, जेणेकरून अनधिकृत होणारा उपसा आणि वाहतूक बंद करून शासनाच्या तिजोरीत महसूल जमा होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा