*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांचा लेख*
*प्रजासत्ताक दिन …*
प्रजासत्ताक दिन या नावातच या दिवसाचे महात्म्य
सामावलेले आहे .या दिवसा पासून आम्ही तन मन धन
आचार विचार कृती या बाबतीत परकियांचे गुलाम न राहता
आमच्या स्वतंत्र झालेल्या राष्ट्राची अस्मिता जपत स्वत:
लिहिलेले कायदे व आचारसंहिता कृतीत आणणार …
आमच्या घटनाकारांनी लिहिलेल्या कायद्यानुसार आमचे
राष्ट्र चालणार .. आमच्यावर कुणी ही आता जुलूम जबरदस्ती
करणार नाही.आम्हाला आता पूर्णपणे आचार विचार लेखन
स्वातंत्र्य आहे … असा या प्रजासत्ताकाचा अर्थ आहे .
बघा .. या दोन शब्दात केवढे स्वातंत्र्य लपलेले आहे .पक्ष्याने
पिंजऱ्यातून भरारी मारावी व उंच अवकाशात स्वैर उडण्याचा
आनंद घ्यावा तशी आपली परिस्थिती होती.आणि दुधात साखर म्हणजे “ लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकाचे
राज्य” अशी जगातील सर्वोत्तम व्यवस्था आपण स्वीकारली.
चिन पाकिस्तान ब्रह्मदेश ही आपल्याच निकटची राष्ट्रे पहा.
आणि आपण पहा . एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात ही
लोकशाही टिकणे केवळ अवघडच नाही पण अशक्य होते पण
आपण एवढे सुदैवी होतो की.. वल्लभभाई पटेल ,राजेंद्रप्रसाद तसेच
चिंतामणराव देशमुखांसारखे सुजाण नेते आपल्याला लाभले व
ही लोकशाही नुसती रूजलीच नाही तर तिची पाळेमुळे घट्ट
झाली व किती ही कठीण प्रसंग आले तरी आपली ही लोकशाही डळमळली नाही की अनागोंदी ही माजली नाही याचे सारे
श्रेय केंद्रातील नेत्यांबरोबरच भारतीय सुजाण जनतेलाही जाते.
भारतीय जनता अतिशय सुज्ञ आहे . ( काही अपवाद वगळता
नेते ही आपल्याला चांगले लाभले)कोणत्या प्रसंगी कसे वागावे
हे भारतीय जनतेला चांगलेच कळते. म्हणून अनेक आपत्ती येऊन ही आपण त्यातून सुदृढ लोकशाही सह सुखरूप बाहेर
पडलो . इतकी सोपी गोष्ट नाही ही, पण आपण ती करून
दाखवली. व जगात आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत हे जगाला दाखवून
दिले .त्यामुळे आपला संयम, स्थिरवृत्ती , लोकशाही टिकवण्याची दृढता यांचे कौतुकच केले पाहिजे .
काही बाबतीत आमची शिस्त व कठोरता कमी पडते म्हणून
प्रचंड लोकसंख्या अज्ञान अंधश्रद्धा या वर आम्ही मात करू
शकलो नाही,म्हणूनच अन्नधान्या बाबत स्वयंपूर्णता यायलाही
आम्हाला खूप वर्षे लागली . आपला लोकसंख्येचा प्रश्न सुटला तर बरेच प्रश्न आपोआप निकालात निघतील .
तो दिवस सुदैवाने लवकर येवो अशी अपेक्षा करू या …
आणि आपण प्रत्येकाने देशासाठी चांगले काम करण्याची
खूप गरज आहे . स्वच्छता पाळा .. हे ही आपल्याला सांगावे
लागते ? मला तर अशा वर्तनाची खूपच लाज वाटते.
शिवाय आपल्याला फक्त समोरचा माणूस भ्रष्ट दिसतो .
आपण स्वत: नाही. लोकसंख्या वाढली आहे हो .. पण मी
त्यात नसतो हो … समोरचा दारूड्या आहे , मी नाही ..
हसावे की रडावे सांगा …? स्वत:ला प्रश्न विचारा .. बरोबर
उत्तरे मिळतील .
तर मंडळी … हा माझा देश आहे एवढी प्रामाणिक भावना
ठेवून देशाकडून काही मागण्या ऐवजी देशाला काही द्या.
प्रामाणिकपणा द्या.. कष्ट द्या .. वेळ द्या .. मग बघा कशी
देशाची प्रगती होते ते … फक्त बोलू नका , कृती करा ..
हो , हा माझा देश आहे .. याला महान करण्याची जबाबदारीही
माझीच आहे .. सरकार नावाची कोणी व्यक्ती नाही ..
आपण सारेच सरकार आहोत ..
“ चला .. आपले राष्ट्र अधिक महान बनवू या ..”
जयहिंद ….
हो .. ही फक्त माझी मते आहेत .. धन्यवाद !
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २६ जानेवारी २०२२
वेळ : रात्री ११: ५१