*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक, कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना*
*मृत्युंजय*
क्षण काल भावनांना मी गोठवून आलो
दार आज मृत्युचे मग मी ठोठवून् आलो
आलो जगात तेंव्हा नव्हती अशी अपेक्षा
लाभेल प्रेम इतुके कधी कोठे नसे उपेक्षा
झोळीत आशीर्वाद कृपा साठवून आलो
दार आज मृत्युचे …….
वात्सल्य् मुकुट , मैत्रीची कवच कुंडले ही
गुरु भक्ती सुदर्शन ,कृपा तेज सांडले ही
मंत्र अमर संजीवन मी आठवून आलो
दार आज मृत्युचे ……
हाती धनुष्य सेवेचे ,करी हा स्वधर्म भाला
हृदयात राष्ट्र भक्तीची धग धगती ज्वाला
परत तुझ्या व्यधींना सहज पाठवून आलो
दार आज मृत्युचे …….
उघड दार ये समोर समजेल तुला सारे
जय हिंद मंत्र मृत्युंजय ऐकशील नारे
राम नाम धाग्यातच विश्व् गाठवून आलो
दार आज मृत्युचे ……
अरविंद
२१/१/२२
.