पर्यटन विकसीत करण्यासाठी सिंधुदुर्ग केंद्राकडून दत्तक
राज्य शासनाच्या कृषीपंप वीज जोडणी धोरणांतर्गत 31 मार्च पूर्वी कृषीपंप ग्राहकांनी लाभ घ्यावा
– पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गनगरी
प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना, राज्य शासनाच्या मागणी नुसार केंद्र शासनाने पर्यटन विकसीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. या धोरणामध्ये वीज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात 66 टक्क्यांपर्यंत सूट देऊन त्यांना वीज बील कोरे करण्याची संधी उपलब्ध केली आहे. 31 मार्च 2022 पूर्वी 66 टक्क्यांपर्यंत सवलत घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले.
पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दतात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, राजेंद्र पराडकर, संदेश पारकर आदी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमत: सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य जणांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. देशाची एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमता कायम राखण्यासाठी अनेक शूर सैनिकांनी हौतात्म्य पत्करलं. त्या सर्व वीरपुत्रांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या सोहळ्यासाठी आज इथं आवर्जून उपस्थित सर्व सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, सैन्यदलातील, तसेच राज्याच्या पोलीस दलातील आजी माजी अधिकारी, कर्मचारी, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पत्रकारिता, समाजकारण आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्व बंधू-भगिनींचं स्वागत करतो. देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही परंपरा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सदैव क्रियाशील रहावे. एकता आणि बंधुता यांचा संदेश देणारी आपली लोकशाही ही जगात सर्वोत्कृष्ट अशीच आहे. अशी ही लोकशाही चिरंतर टिकावी यासाठीही आपण सजग रहावे.
आजच्या या घडीला देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क, सॅनिटायझर आणि समाजिक अंतराचे पालन करावे. लसीकरणही करुन घ्यावे. कोरोनावर लवकरच आपण निश्चितपणे अंतिम विजय मिळवू. त्यासाठी आपणाला नियमांचे पालन करून संयमाने लढायचे आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले. राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाच जिल्ह्यांच्या बाबत मागणी केली होती. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन विकसीत करण्यासाठी केंद्र शासनाने दत्तक जिल्हा घोषीत केला आहे. त्याचबरोबर यवतमाळ हा जिल्हा शिक्षणासाठी घेण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा या पूर्वीच पर्यटन जिल्हा जाहीर झाला आहे. पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी निश्चितच चांगल्या पायाभूत सुविधा केल्या जातील, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. या धोरणामध्ये वीज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात 66 टक्क्यांपर्यंत सूट देऊन त्यांना वीज बील कोरे करण्याची संधी उपलब्ध केली आहे. 31 मार्च 2022 पूर्वी 66 टक्क्यांपर्यंत सवलत घेवून वीज बील कोरे करण्याची ही शेवटची संधी आहे. या योजनेत कृषीपंप ग्राहकांचा सहभाग महत्वाचा आहे. वीज बिलाच्या वसूल झालेल्या रकमेतून 33 टक्के ग्रामपंचायत व 33 टक्के जिल्हा पातळीवर हा निधी पायाभूत सुविधेसाठी वापर करता येणार आहे. तरी कृषीपंप ग्राहकांनी या धोरणाचा लाभ घेऊन वीज बील कोरे करावे असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय व गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांना पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास आजी – माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी उपस्थितांची भेट घेतली. तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, डॉ.जयकृष्ण फड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेत अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर, सर्व सभापती, विषय समिती प्रमुख व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. जिल्हा न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.