महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम – २०२१ ची कडक अंमलबजावणीचे आदेश मी सर्व सागरी जिल्ह्यांच्या साहाय्यक मत्स्य आयुक्तांना दिलेले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करीत असताना अवैध मासेमारी करणाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर व सागर सुरक्षा रक्षकांवर हल्ले होण्याची बाब अत्यंत निषेधार्ह आहे. आपण या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, अशा हल्लेखोर प्रवृत्तींना वेळीच जरब बसावी यासाठी गुन्हे नोंद करुन कठोरात-कठोर कारवाई करण्याचा इशाराच राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी दिला आहे.
शुक्रवारी रात्री आचरा बंदर येथे जेट्टी (जिल्हा -सिंधुदुर्ग) येथे मत्स्य विभागाचे अधिकारी आणि तीन सागर सुरक्षा रक्षकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे किनारपट्टी हादरुन गेली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
मंत्री शेख पुढे म्हणाले की, पारंपरिक मच्छीमारांचे हित आणि शाश्वत मासेमारीला प्रोत्साहन दृष्टीसमोर ठेऊनच ४० वर्षांनंतर नवीन मासेमारी कायदा लागू करण्यात आलेला आहे. हा कायदा फक्त कागदावरतीच न राहता त्यातील कलमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी मी दिलेल्या सूचनांनुसारच मत्स्य विभागाचे अधिकारी आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा कर्तव्यतत्पर व प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होऊ नये यासाठी आता अशा प्रवृत्तींवर लगाम घालण्याची वेळ आली आहे.
मला अशा अधिकाऱ्यांचा तसेच सागर सुरक्षा रक्षकांचा अभिमान आहे. मत्स्यव्यवसाय खात्याचा मंत्री या नात्याने मी त्यांच्यामागे ठामपणे उभा आहे असही शेख शेवटी म्हणाले.