भात कांडप गिरण मालक व ग्रामपंचायतीला प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे आदेश
सावंतवाडी :
भात कांडप गिरणीतून बाहेर पडणाऱ्या कोंड्या बाबत पंधरा दिवसात उपाययोजना करण्याचे आदेश प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी तळवडे येथील भात कांडप गिरण मालक व ग्रामपंचायतीला दिले आहेत. याबाबत उपाययोजना केल्या शिवाय भात कांडप गिरण सुरू करण्यात करू नये असे आदेश देखील उपविभागीय महसूल अधिकारी यांनी दिले आहेत.
तळवडे येथील तक्रारदार विठोबा पेडणेकर यांच्या वतीने अँड बालाजी रणशूर, अँड जी जी बांदेकर यांनी काम पाहिले. तळवडे येथील विठोबा मधुकर पेडणेकर, विनायक चंद्रकांत पेडणेकर, संजना पेडणेकर, नीलेश कोरगावकर, दिवाकर मेस्त्री यांनी प्रांताधिकारी यांच्या न्यायालयामध्ये याबाबत दावा दाखल केला होता. भात कांडप मशीन चे गिरणीचे लवू पेडणेकर व भूषण पेडणेकर यांनी भात काडंप गिरणीतून बाहेर पडणाऱ्या कोंड्या व कचऱ्याचे प्रदूषण टाळण्यासाठी काही तरतूद केलेली नव्हती त्यामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात आपला अर्ज दाखल केला होता. यासंदर्भात प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली आणि गिरणीतून बाहेर पडणाऱ्या कोंड्या बाबत तात्काळ उपाययोजना करावी. येत्या पंधरा दिवसात उपायोजना करून तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून दाखला घेऊन तो सादर करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांनी केल्या आहेत.