किर्ती शिलेदार यांच्या निधनाने एक गोड भावपूर्ण सूर अनंतात विरून गेला…
संगीत नाट्यविश्वात गायक आणि अभिनेत्री
ही त्यांची प्रमुख ओळख..
प्रसिद्ध गायक जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या..
संगीत नाटक हाच त्यांचा ध्यास आणि श्वास..
वयाच्या दहाव्या वर्षापासून त्या रंगभूमीवर रमल्या.
१६अॉगस्ट १९५२ साली त्यांचा जन्म झाला.
आई वडीलांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी
संगीताची आराधना सुरु केली. त्यांचे शास्त्रीयसंगीताचे उच्च शिक्षण निळकंठबुवा
अभ्यंकर अभ्यंकर यांच्याकडे झाले…
संगीत रंगभूमीशी त्यांचे अतूट नाते जडले.
संगीत कान्होपात्रा , संगीत स्वरसम्राज्ञी ,
संगीत सौभद्र ही नाटके अतिशय गाजली.
त्यांच्या नाटकाचे ४०००हून अधिक प्रयोग झाले.
गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी घेतलेले प्रचंड परिश्रम यामुळे त्यांच्या सर्वच नाटकातल्या भूमिका प्रचंड गाजल्या.
बालगंधर्वांची संगीत नाट्य परंपरा त्यांनी जपली.
त्या सुवर्ण युगाचीच आठवण त्यांनी करून दिली.
नाटकात भूमिका रंगवताना त्यांनी त्या त्या भूमिकेचा अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला.
संगीताच्या स्वतंत्र मैफीली ही त्यांनी गाजवल्या.
परदेशी दौरे करुन भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी त्यातल्या सौंदर्य खुणांसहीत अटकेपार नेले..गायनात अकारण होणारे शब्दोच्चार त्यांनी टाळले.”स्वर ताल शब्द संगती”या नावाचे पुस्तकही त्यांनी लिहीले.आणि संगीत प्रेमींसाठी ते अत्यंत उपयुक्त वाचनीय ठरले आहे.
कीर्तीमाला शिलेदार यांचे नाव घेताच,
कशी केलीस माझी दैना
नरवर कृष्णासमान
नृपकन्या तव जाया
एकला नयन विषय
बलमा आये रंगीले…अशा अनेक सुमधुर नाट्यगीतांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही…त्यांची सारीच गाणी अक्षरश: रसिकांनी डोक्यावर घेतली…
२०१४ साली त्यांना आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमीचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला.
बालगंधर्व पुरस्कार आणि दिल्ली संगीत अकादमीकडूनही त्यांना पुरस्कार मिळाले…
अभिनय आणि सुरेल गायनाने त्यांनी संगीत रंगभूमीला समृद्ध केले..खर्या अर्थाने त्या
संगीत रंगभूमीवरच्या बिनीच्या शिलेदार होत्या…
आम्ही सारे संगीत नाट्यप्रेमी त्यांच्या सदैव ऋणांत राहू…श्रोत्यांना त्यांनी इतकं दिलंय् की स्वत: रंगदेवताही आज पाणावली आहे…
या संगीतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली…🙏🙏💐💐
*सौ. राधिका भांडारकर पुणे*