बागायत, मालवण येथील ग्रंथालयात भरला गप्पाटप्पा आणि कवी मेळा..
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त *माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगाव-बागायत* येथे प्रसिद्ध मालवणी कवी तथा गझल मार्गदर्शक श्री. विजय जोशी यांच्याशी साहित्यिक गप्पा आणि कवीसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्ताने मालवणी कवी श्री.रुजारिओ पिंटो यांनी “तू हसताना दिसलस काय”, देवगडचे श्री. प्रमोद जोशी यांनी मंगेश पाडगावकरांनी दिलेली जबाबदारी पार पाडत अप्रतिम “बोलगाणी” सादर केली. श्री. नितीन वाळकेंच्या गप्पा, श्री. मंदार सांबारी यांनी “खयसून ह्या सगळा पुण्य माझा घडला” , श्री. दीपक पटेकर यांनी “वेदना अंतरीच्या”, व “शाळेतील प्रेम” ही मालवणी कविता, श्री. संजय धुरी यांनी मालवणी कविता सादर करुन कार्यक्रमात बहार आणली. “कवी विजय जोशी सरांनी देखील मी बोललंय तर माझा तोंड दिसता” ही मालवणी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर गझलकार कै.मधुसुदन नानिवडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बालगायक कु.आर्या भोगले, स्वरा भोगले व यशश्री ताम्हणकर यांनी स्वागतगीत सादर केले. ग्रंथालय अध्यक्ष अरुण भोगले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना विजय जोशी म्हणाले, *“वेदनेतून आलेल्या संवेदनांचा आलेख म्हणजे कविता. कवीकडे वाचन अफाट असले पाहिजे. आपल्या बोलीभाषेतून जास्तीत जास्त लेखन झाले पाहिजे. विनोदी लेखनाचा बरोबरच समाजप्रबोधनपर लेखन सुद्धा व्हावे. आपल्या कवितेवर संस्कार होणे फार महत्त्वाचे आहे. कवितेवर प्रेम कराल तर नक्कीच कविता तुमच्यावर प्रेम करेल.”*
कवी प्रमोद जोशी यांनीही आपल्या बोलगाणी कवितांसोबत आपले अनुभव कथन केले. *“कवीने आपल्या कवितेत मांडलेल्या वेदना काही वेळा वाचक समजून घेत नाहीत”* ही खंत बोलून दाखवताना रसिकांनी कवितेतील भावना समजून त्याचा आस्वाद घ्यावा ही अपेक्षा व्यक्त केली. वेगवेगळ्या काव्यप्रकारांवर विजय जोशी व प्रमोद जोशी यांनी आपले अनुभवातून आलेले उत्तम विचार मांडत अतिशय सुरेख मार्गदर्शन केले. संध्याकाळी ४.०० वाजता सुरू झालेला साहित्यिक गप्पाटप्पा आणि काव्यवाचन कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कवी विजय जोशी यांनी गांधीजींवर लिहिलेली गझल सादर करत कार्यक्रमाचा समारोप केला.
यावेळी नितीन वाळके यांनी साहित्यिक परिसंवाद घडवून आणला. यात ज्योती तोरसकर, अर्चना कोदे, मंदार सांबारी यांनी सहभाग घेतला. श्री. विजय जोशी यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रंथालयाच्या वतीने श्री रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथालय अध्यक्ष अरुण भोगले, सचिव गुरुनाथ ताम्हणकर, दीपक भोगले, ज्योती तोरसकर, अर्चना कोदे, महादेव सुर्वे, अरुण वझे, दत्ताराम भोगले, बापू राणे, मोडक, तन्वी राणे, छाया नाईक, मनाली परब व वाचक ग्रामस्थ उपस्थित होते.