You are currently viewing संदर्भ ग्रंथ:- संकल्प सिध्दीचे गुपित – विश्वप्रार्थना

संदर्भ ग्रंथ:- संकल्प सिध्दीचे गुपित – विश्वप्रार्थना

💡प्रश्न : *आपण विश्वप्रार्थना निर्माण केली परंतु मुळात अशी विश्वप्रार्थना निर्माण करण्याचे प्रयोजन काय ?*

 

✅ 🎯 *जगातील प्रत्येक माणूस जीवनभर सुख मिळविण्यासाठी धडपड करीत असतो. प्रत्यक्षात मात्र काही अपवाद वगळता माणसाला सुख मिळण्याऐवजी त्याच्या वाट्याला दुःखच येते. प्रयत्न करूनही सुख मिळत नाही आणि दुःख टाळण्याचा प्रयत्न करूनसुद्धा माणसाच्या वाट्याला दुःखच येते.कोलंबस हिन्दुस्थानचा शोध घेण्यासाठी निघाला,त्यासाठी त्याने भगीरथ प्रयत्न केले,परंतु प्रत्यक्षांत मात्र तो शेवटी पोहचला अमेरिकेला.तशीच माणसाची गत झालेली आहे.भगीरथ प्रयत्न करूनसुद्धा माणूस सुखाच्या प्रदेशावर पोहचण्याऐवजी तो शेवटी पोहचतो तो दुःखाच्या प्रदेशावर.प्राचीन काळापासून हा प्रकार घडतच आहे.हे असेच चालणार,असे माणूस गृहित धरून चाललेला आहे.परंतु सुख न मिळण्याचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न कोणीही केलेला दिसत नाही,आणि जे काही तथाकथित प्रयत्न झाले ते चुकीच्याच दिशेने झाले व अजूनही चुकीच्याच दिशेने होत आहेत.जमिनीवर पडलेला पारा हाताला लागतो पण हातात येत नाही,समोर पडलेली आपली सावली आपल्याला दिसते पण तिला पकडता येत नाही किंवा काही अंतरावर समोर आपल्याला क्षितिज दिसते पण तेथे पोहचण्याचा प्रयत्न केला तर त्या क्षितिजापर्यंत आपण पोहचू शकत नाही,त्याचप्रमाणे सुख आज मिळेल उद्या मिळेल या आशेने जगणाऱ्या माणसाला शेवटपर्यंत सुखाचा लाभ होत नाही.*

 

🎯 *याचे मूळ कारण शोधण्याचा जीवनविद्येने प्रयत्न केला.’सुख हे मानण्यात आहे’ हा सर्व लोकांचा समज मुळात चुकीचा तर आहेच परंतु तो गैरसमजच मानवजातीच्या सर्व दुःखाचे मूळ आहे.मग सुख कशात आहे? जीवनविद्या सांगते,*

 

*_सुख हे मानण्यात नाही,सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही तर सुख हे देण्यात आहे,कारण इतरांना तुम्ही जे सुख देता ते सुख तुमच्याकडे बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करते._*

 

🎯 *ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते,सुख देण्याने सुख वाढते आणि दुःख दिल्याने दु:ख वाढते.या सिद्धांताचे थोडक्यात स्पष्टीकरण करणे इष्ट वाटते.*

*आनंदस्वरूप,जाणीवरूप,दिव्य चैतन्यशक्ती म्हणजे परमेश्वर हा परमेश्वर सर्व भूतमात्रात वास करतो,तसा तो प्रत्येकाच्या शरीरात पण ईश्वररूपाने वास करतो.हा ईश्वर सच्चिदानंदस्वरूप असून त्याचेच ‘शरीर’ हे व्यक्त व स्थूल रूप आहे.असे हे दिव्य शरीर हा आनंदाचा डोह असून त्यात ‘मी’ म्हणणारा ‘मी’ हा आनंद तरंग आहे. या आनंदाला ‘स्वानंद’ असे म्हणतात.याचाच भावार्थ असा की, जो स्वानंद आपले स्वरूप आहे तो मिळविण्याचा प्रयत्न करणे हेच अडाणीपणाचे लक्षण होय. म्हणूनच जीवनविद्येने एक महत्त्वाचा सांगितला,*

 

🎯 *_आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे, या सत्याचे भान ठेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.प्रथम आनंद द्या मग आनंद लुटा,प्रथम सुख द्या मग सुख घ्या,हा निसर्गाचा नियम आहे._*

 

या संदर्भात खालील म्हणी चिंतनीय आहेत :

 

🎯 *१) भाव तसा देव.*

🎯 *२) करावे तसे भरावे.*

🎯 *३) करणी तशी भरणी.*

🎯 *४) पेरावे तसे उगवावे.*

🎯 *५) क्रिया तशी प्रतिक्रिया.*

 

*या संदर्भात नामदेव महाराज देवाला उद्देशून म्हणतात,*

 

*घेसी तेव्हा देसी । ऐसा अससी उदार ।।*

 

🎯 *याचा भावार्थ उघड आहे. देवाकडून मिळण्यासाठी प्रथम देवाला द्यावे लागते.तात्पर्य,आनंद किंवा सुख मिळविण्यासाठी प्रथम आपण ते इतरांना दिले पाहिजे. परंतु येथे एक प्रमुख अडचण निर्माण होते ती ही की,माणसाला त्याच्या हृदयात आनंदसागर आहे याबद्दल पूर्ण अज्ञान असते. त्याचप्रमाणे त्याच्या ठायी असणारा स्वानंद इतरांना द्यायचा असतो तेच त्याला ठाऊक नसते.त्यामुळे इतरांना स्वानंद देण्याचा मार्ग कोणता याबद्दलसुद्धा तो पूर्ण अज्ञानी असतो.परंतु या अडचणीवर मात करणे शक्य आहे. विजेबद्दल माणसाला जरी पूर्ण अज्ञान असले तरीसुद्धा तो विजेच्या उपकरणांच्याद्वारे विजेचा उपयोग स्वतःसाठी करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे हृदयातील स्वानंदाच्या सागराबद्दल माणसाला जरी अज्ञान असले तरीसुद्धा तो इतरांना स्वानंद विशिष्ट प्रकारे वाटू शकतो. _आपल्याच ठिकाणी असणारा स्वानंद इतरांना देण्याचा मार्ग एकच आहे.हा मार्ग म्हणजे “शुभ विचार करणे,शुभ इच्छा करणे,शुभ बोलणे,शुभ करणे’ हा होय._ विचाराकडून आपण पुढे सरकत-सरकत आचारापर्यंत जातो.*

 

*’Mind moves from thought to thing’*

 

हा महत्त्वाचा सिद्धांत लक्षात ठेवणे आवश्यक आहे.*विचारांचे परिवर्तन उच्चार आचारात होते.म्हणून शुभविचार करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.शुभ विचार करणे म्हणजे प्रत्यक्षात सुंदर विचारांची बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनात केलेली पेरणी आहे.बहिर्मनामध्ये सतत शुभविचार केल्याने ते शुभ विचार अंतर्मनामध्ये जातात,तेथे मुरतात, मूळ धरतात,तेथूनच स्फुरतात आणि जीवनात साकार होतात._*

 

या संदर्भात नेपोलियन हिल सांगतो,*

🎯 *Positive thinking sets in motion positive forces which bring positive results to pass.*

 

*दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे सतत शुभ विचार केल्याने माणसाच्या अंतर्मनाचा पॅटर्न (घडण) बदलतो,त्याचे परिवर्तन होते आणि त्याची मानसिकतासुद्धा पूर्ण बदलते.मानसिकता बदललेला असा माणूस स्वतःसुखी होऊन इतरांच्या सुखाला कळत-नकळत व प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरतो.*

 

🎯 *दुसरा मुद्दा असा की,ही विश्वप्रार्थना गरिबांना वरदान श्रीमंतांना आधार व विश्वाला उपयुक्त असून ती धर्मातीत,वैश्विक व शाश्वत आहे.ही विश्वप्रार्थना गरिबांना अक्षरश:वरदान आहे कारण त्यांना कोणाचाच आधार नसतो.देव गरिबांचा वाली आहे असे म्हणतात,परंतु प्रत्यक्षात मात्र गरिबांना तसा अनुभव येत नाही. परंतु विश्वप्रार्थना ही गरिबांचा वाली असून त्यांना मिळालेला एक भक्कम आधार आहे.अनेक भोके असलेल्या बादलीत कितीही पाणी भरले तरी ती बादली रिकामीच होते.त्याप्रमाणे गरिबांच्या संसाराच्या बादलीला अनेक भोके पडलेली असतात.ती भोके खालीलप्रमाणे सांगता येतील:*

 

💣 *१) दारू,गुटखा,तंबाखू अशी व्यसने.*

 

💣 *२) व्यसनामुळे प्रकृती बिघडणे परिणामी त्यांच्यामागे डॉक्टरचा ससेमिरा.*

 

💣 *३)अमर्याद संतती.*

 

💣 *४) अमर्याद संततीमुळे स्त्रियांची प्रकृती ढासळणे त्यामुळे डॉक्टर पाचवीला पुजलेला व औषधांचा भयंकर खर्च.*

 

💣 *५) अमर्याद संततीमुळे मुलांसाठी शिक्षण,डॉक्टर वगैरे गोष्टीवर भरमसाठ खर्च.*

 

💣 *६) गरिबीमुळे कठीण प्रसंग येतात व त्यातून सुखासाठी बुवा, बाबा,भगत,देवऋषी यांच्याकडे जाऊन केलेला भरमसाठ खर्च.*

 

💣 *७) गांजलेल्या परिस्थितीत भविष्यात काही आशेचा किरण असेल या अपेक्षेने ज्योतिष्याकडे जाणे व त्यासाठी होणारा खर्च.*

 

🎯 *संसाराच्या बादलीला अशी ही सात मोठी भोके असताना कितीही पैसा मिळविला तरी तो अपुराच पडणार,हे सांगायला ज्योतिष्याची गरज नाही.ही भोके बुजविण्याचे कार्य जीवनविद्या मिशन करते. जीवनविद्येमध्ये आलेल्या नामधारकांना जीवनविद्येचे ज्ञान मिळते,चांगली संगत मिळते, विश्वप्रार्थनेची गोडी लागते व त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत पूर्ण परिवर्तन होते.रिकामपणी सतत विश्वप्रार्थना केल्याने व चांगल्या लोकांच्या संगतीमुळे नामधारकांच्या सर्व अंधश्रद्धा गळून पडतात,मर्यादित संततीचे महत्त्व कळते,आरोग्य सुधारते,मुले चांगली शिकू लागतात,अनिष्ट व्यसनांच्या तावडीतून सुटका झाल्यामुळे त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारते व जीवनात प्रगती होत जाते.*

 

🎯 *विश्वप्रार्थना ज्याप्रमाणे गरिबांना उपयोगी ठरते, त्याचप्रमाणे ती श्रीमंतांना सुद्धा भक्कम आधार होऊ शकते. गरिबीमुळे गरिबांची दु:खे वेगळी असतात तर श्रीमंतीमुळे श्रीमंतांची दु:खे वेगळी असतात.श्रीमंत होण्यासाठी,पैसा मिळविण्यासाठी व संपत्ती मिळविण्यासाठी त्यांनी जो व्याप वाढविलेला असतो त्यामुळे ते चिंता,काळजी,भीती व मनस्ताप या गोष्टींनी घेरले जातात, परिणामी त्यांना जीवनात सतत मोठ्या प्रमाणावर ताणतणावांना सामोरे जावे लागते.हा ताणतणाव नष्ट करण्यासाठी विश्वप्रार्थना हा रामबाण उपाय आहे.रिकामपणी विश्वप्रार्थना म्हणण्याचा छंद जर या श्रीमंतांनी जोपासला तर बऱ्याच प्रमाणात ताणतणावातून मुक्त होऊन त्यांना मनःशांती लाभेल हे निश्चित.*

 

 

🎯 _*विश्वप्रार्थना ही विश्वाला म्हणजे अखिल मानवजातीला उपयुक्त ठरू शकते.विश्वप्रार्थना ही धर्मातीत,वैश्विक आणि शाश्वत आहे.ती धर्मातीत आहे याचे कारण ती सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी आहे.ती शाश्वत आहे त्याचे कारण ती निसर्गनियमांवर अधिष्ठित आहे आणि ती वैश्विक आहे याचे कारण ती विश्वातील प्रत्येक माणसासाठी उपयुक्त आहे.*_

 

🎯 *जगातील प्रत्येक माणसाला सुखी जीवन प्राप्त व्हावे अशी इच्छा असते,परंतु ती प्राप्त करून घेण्यासाठी अचूक मार्ग ज्ञात नसतो.लोकांच्या या अज्ञानाचा धूर्त व लबाड माणसे फायदा घेतात व त्यांना चुकीचे मार्गदर्शन करून स्वतःच्या पोळीवर तूप ओढतात. लोकांच्या अंधश्रद्धेला व त्यांच्या अज्ञानाला धर्म,जात,पंथ,वंश यांच्या नांवाखाली खतपाणी घालून ही लबाड मंडळी जनतेमध्ये एकमेकांबद्दल दुरावा व द्वेष निर्माण करतात आणि त्याचा पुरेपुर फायदा स्वत:साठी करून घेतात. जीवनविद्येने मात्र सुखी होण्याची गुरुकिल्ली लोकांच्या हातात दिलेली आहे.ही गुरुकिल्ली म्हणजे,तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते सुख बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करील.इतरांना सुखी करण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे विश्वप्रार्थना करणे हा होय.

 

*’क्रिया तशी प्रतिक्रिया’ या निसर्गनियमाप्रमाणे विश्वप्रार्थना करण्याने माणसाच्या मानसिकतेत परिवर्तन घडते,त्याचे इतरांशी संबंध सुधारतात,जीवनाकडे पहाण्याची दृष्टी बदलते,परिणामी तो स्वत:सुखी होऊन इतरांना यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न करतो.सुंदर विचारांनी भरलेल्या व भारलेल्या विश्वप्रार्थनेचे प्रयोजन हेच आहे.*

 

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा