स्थानिक पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी बरखास्त करणे योग्य आहे का?
संपादकीय….
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर वर्चस्व असणाऱ्या शिवसेनेला का पहावे लागते पराभवाचे तोंड? हाच मुख्य प्रश्न असताना वरिष्ठ पातळीवरून शिवसेनेने दोडामार्ग तालुका कार्यकारिणी बरखास्त करून पहिला धक्का दोडामार्ग येथील शिवसेनेला दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची पीछेहाट झाल्यानंतर सेनेला पुन्हा चांगले दिवस येतील अशी आशाच वाटत नव्हती. परंतु मरगळलेल्या शिवसेनेला जिल्हाप्रमुख पदावर नव्याने आलेल्या वैभव नाईक यांनी पायावर उभे राहण्याची ताकद दिली होती, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेला लढण्याची ताकद मात्र देणे त्यांच्या आवाक्यात नव्हते. गावागावात शिवसेनेचे कार्यकर्ते विखुरलेले होते, पण स्थानिक सक्षम नेतृत्व नसल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात असूनही सेना ऐन लढाईत मार खात होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून आमदार दीपक केसरकर शिवसेनेत डेरेदाखल झाले आणि सुप्त असलेल्या शिवसैनिकांमध्ये हळूहळू त्यांनी जोश भरण्यास सुरुवात केली. संपूर्ण जिल्हा पिंजून काढून शिवसैनिकांना लढण्यासाठी जागृत केले. सावंतवाडी-वेंगुर्ला-दोडामार्ग मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनविला. त्याचेच फलित म्हणजे शिवसैनिक जागे झाले, आक्रमक होऊन नारायण राणे यांच्या विरोधात लढण्यासाठी ताकद मिळाल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बेधडकपणे निवडणुकांमध्ये शिवसेनेला वर्चस्व प्राप्त करून दिले. जिल्ह्यात नारायण राणेंचा दबदबा असताना राणेंच्या विरोधात बोलण्याची हिम्मत केली ती सावंतवाडीच्या आमदार दीपक केसरकर यांनीच…आणि तिथूनच राणेंचा करिष्मा कमी झाला आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात दोन वेळा दीड लाखांपेक्षा जास्त मते मिळवून शिवसेना विजयी झाली, नारायण राणेंचा कुडाळमध्ये पराभव झाला, वैभव नाईक विजयी झाले परंतु शिवसेनेच्या यशाला कारणीभूत होता तो दीपक केसरकर यांचा करिष्मा…
दीपक केसरकर यांच्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात राणेंचे वर्चस्व कमी झाले आणि शिवसेनेला सोनेरी दिवस आले. केसरकरांचे शिवसेनेत वजन वाढले, परंतु आपल्या पक्षाचा असला तरी दुसरा मोठा झाला की त्याचे पाय खेचले जातात, तसेच झाले आणि केसरकरांचे पक्षश्रेष्ठींकडे असलेले वजन कमी करण्यात आले….जिल्ह्यातील एकमेव असलेले मंत्रिपद जिल्ह्यातून रत्नागिरीत गेले आणि जिल्ह्यावर पालकमंत्री म्हणून रत्नागिरीतून आयात झाली तिथेच जिल्ह्यातील शिवसेना कमकुवत होत गेली. दीपक केसरकर पालकमंत्री असताना जिल्ह्यात शिवसेनेला यश मिळत नाही, जिल्ह्याचा विकास रखडला अशी अफवा उठविण्यात आली. आणि दीपक केसरकरांचे सेनेतील महत्त्व कमी करण्याचे झालेले प्रयत्न झाले, त्यात शिवसेनेतीलच महत्त्वाकांक्षी नेत्यांना यशही आले पण खरोखरच जर केसरकरांमुळे विकास रखडला होता तर गेल्या तीन वर्षात विकासाचे हात धरले कोणी? रस्त्यांचे डांबरीकरण हा एखाद्याचा व्यवसाय असू शकतो परंतु त्याला विकास म्हणता येत नाही. परंतु काय हाच विकास साधण्यासाठी केसरकर अडसर ठरत होते का? असा प्रश्न आज दोडामार्ग मध्ये झालेल्या पराभवानंतर उपस्थित होत आहे.
पालकमंत्री बदलले परंतु जिल्ह्यात शिवसेनेला चांगले दिवस का आले नाहीत?
आज जिल्ह्यात निवडणुका आल्या की पैशांचा पाऊस पडतो आणि निवडणुका हरल्यानंतर पैशांच्या नावाने बोंब होते, परंतु काय पैसाच निवडणुका हरण्यास कारणीभूत आहे? याचे आत्मपरीक्षण जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी आणि शिवसेनेच्या प्रमुखांनी करणे आवश्यक आहे. दीपक केसरकर शिवसेनेत आले परंतु त्यांचे शिवसेनेत पानिपत करण्यात आले परंतु नारायण राणे भाजपात गेले तिथे त्यांना बळ देऊन त्यांचे वर्चस्व वाढविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात तळाला असलेला भाजपा आज पहिल्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्यात दोडामार्गमध्ये शिवसेना पक्षाचे पानिपत झाले, वैभववाडी मध्ये शिवसेनेने लढत दिली, परंतु ती अपुरी पडली. कुडाळमध्ये भाजपात झालेल्या फुटीचा शिवसेनेला फायदा झाला परंतु सत्ता मिळेलच याची आशा राहिली नाही. संदेश पारकर यांच्यावर जबाबदारी असलेली देवगड नगरपंचायत पारकरांच्या कुशल नेतृत्वात नितेश राणेंना चितपट देत शिवसेनेने खेचून आणली. हीच काय ती शिवसेनेची जिल्ह्यातील कमाई.
भविष्यात सावंतवाडी, वेंगुर्ला, नगरपालिकेच्या निवडणूक व्हायच्या आहेत, सावंतवाडीत विरोधकांपेक्षा शिवसेनेतील केसरकरांचे विरोधकांचीच जास्त धास्ती असल्याचे सूर सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. त्यामुळे विरोधकांवर मात करता करता केसरकरांना झारीतील शुक्राचार्यांशी देखील लढत द्यावी लागणार आहे. येत्या नगरपालिका निवडणुकीत दीपक केसरकरांना शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने साथ दिली तरच सावंतवाडी वेंगुर्ल्यात शिवसेना सत्तेत येऊ शकते आणि त्याचेच प्रतिबिंब भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पडणार अन्यथा पाय ओढण्याचेच प्रकार शिवसेनेत होत राहिले तर येणाऱ्या निवडणुका शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असले आणि शिवसेना नेतृत्वाला वेळ निघून गेल्यावर तेलही गेले आणि तूपही गेले…हाती राहिले धुपाटने अशीच परिस्थिती पहावयास मिळेल.