You are currently viewing संदर्भ ग्रंथ:- जीवनाकडे पाहण्याची दृष्टी

संदर्भ ग्रंथ:- जीवनाकडे पाहण्याची दृष्टी

✒️ *प्रकरण:- समदर्शन.*

 

*समता आणि विषमता ही दोन्ही जीवनाची अविभाज्य अंगे होत. एकाच नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे समता आणि विषमता या जीवनाच्या दोन बाजू आहेत.समतेचाच विस्तार विषमतेत होतो तर विषमतेत समता अधिष्ठान स्वरूप असते.परंतु ही वस्तुस्थिती लक्षात न घेतल्यामुळे विषमता मोडून समता आणण्याचा प्रयत्न केला जातो.अशी तोडमोड करणारे लोक पहाता पहाता स्वत:च मोडीत निघतात,पण विषमता मात्र कायम राहते.विषमता हा निसर्गाचा स्वभाव आहे,इतकेच नव्हे तर विषमतेत निसर्गाचे ऐश्वर्यदर्शन घडते.विश्वात कुठेही नजर टाकली तर सर्वत्र विषमतेचेच दर्शन घडत असते.माणूस म्हणून सर्व माणसे समान असतात,परंतु प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा असतो. सर्वच अंगाने माणसे एकमेकांपेक्षा वेगळी असतात.प्रत्येक माणसाचे रूप,रंग,बुद्धी,हुशारी,कार्यक्षमता, स्वभाव वेगवेगळे असतात.इतकेच नव्हे तर प्रत्येकाचे अक्षर,चालण्याची पद्धत,आवाज ही सुद्धां वेगवेगळी असतात. त्याचप्रमाणे अखिल विश्वात सुद्धां विषमता ओतप्रोत भरलेली आहे. निरनिराळे प्राणी,पक्षी,वृक्ष,जलचर वगैरे सर्व ठिकाणी विषमतेचे दर्शन घडत असते.म्हणून विषमता मोडण्यात शहाणपण नसते.हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वात विषमता हे परमेश्वराचे ऐश्वर्य व सौंदर्य आहे,त्याचप्रमाणे माणसा-माणसामध्ये जी विषमता आहे त्यामध्ये सुद्धा निसर्ग योजना असते.निरनिराळी माणसे निरनिराळ्या आवडीची, स्वभावाची बुद्धीची,हुशारीची व कार्यक्षमतेची असतात व म्हणूनच विश्वाचे रहाटगाडगे व्यवस्थित चाललेले आहे.निरनिराळी माणसे निरनिराळे व्यवसाय करतात व त्यातूनच मानवी जीवन फुलत असते.थोडक्यात,विषमता हा निसर्गाचा स्वभाव असल्यामुळे विषमता मोडून समता आपणता येणे शक्य नाही.दुसरा मुद्दा असा की,निसर्गनिर्मित विषमता असते त्याप्रमाणे मानवनिर्मित विषमता असू शकते.श्रेष्ठ-कनिष्ठ,उच्च-नीच, श्रीमंत-गरीब,अमीर-फकीर अशा प्रकारची मानवनिर्मित विषमता अनिष्ट असून विशिष्ट प्रकारच्या परिणामकारक उपाय योजना करून,कांही प्रमाणात ही विषमता कमी करणे शक्य आहे व माणूसकीच्या दृष्टीने तसे प्रयत्न होणे आवश्यक सुद्धा आहे.तिसरा मुद्दा असा की,मानवनिर्मित विषमतेमध्ये जे विष आहे ते विष अमृत दृष्टीने दूर केले पाहिजे.दृष्टीत अमृतही असू शकते व विषही असू शकते.आई आपल्या लेकराकडे पाहताना किंवा मित्र मित्राकडे पाहताना किंवा गुरुशिष्य एकमेंकाकडे पाहताना किंवा प्रेमी युगुले एकमेकांकडे पाहताना अमृत दृष्टीने पाहतात व ती अमृत दृष्टी उभय पक्षी पोषक ठरत असते. याच्या उलट एकमेकांचा द्वेष, मत्सर,तिरस्कार,हेवा,असुया करणारी माणसे विषमय दृष्टीने एकमेकांकडे पहातात व ती विष दृष्टी बाधक ठरते.म्हणून विष दृष्टी टाकून अमृत दृष्टीने पाहण्यात समता असते.या अमृत दृष्टीला समदर्शन असे म्हणतात. माणसाच्या माणूसकीचे दर्शनही येथेच घडत असते.*

🎯 *जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत |*

*हा भक्तियोग निश्चित | जाणा माझा ।।*

*या एका ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘समदर्शन’ नेमके कशात आहे,या वर्म आणि मर्म उत्कृष्टपणे सांगितलेले आहे.*

 

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा