मालवण :
मालवण तालुक्यातील चुनवरेस्थित भालचंद्र गावडे महाराज यांचे मंगळवारी पहाटे पिंगुळी रायवाडी येथे देहावसान झाले. बुधवारी त्यांचा देह पिंगुळी येथुन टाळगजराच्या नादात चुनवरे येथील निवासस्थानी आणण्यात आला.
यानिमित्ताने सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणावर महाराजांचे भक्तगण दर्शनासाठी उपस्थित होते. महाराजांचा देह भव्य मंडपात दर्शनासाठी ठेवून भक्तमंडळीकडून अखंड हरीनाम भजन चालू होते. नरसोबाच्या वाडी वरुन आलेल्या ब्राम्हणाकरवी विधीवत मंत्रौपचार करुन महाराजांचा देह जय श्रीराम जयजय राम या घोषाने परिक्रमा करुन समाधीस्थळी आणत सायंकाळी त्यांना विधीवत समाधी देण्यात आली. यावेळी अंत्यदर्शनासाठी समाधीस्थळी मोठी गर्दी झाली होती. अखेर चुनवरेस्थित भालचंद्र महाराज जयघोषात समाधिस्त होऊन अनंतात विलीन झाले.

