*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना*
*विडा प्रीतीचा*
जसा सरकला पडदा माझ्या पदराचा तुजवरचा
नवीन ओळख पहा सांगतो ठसा चेहऱ्यावरचा
विझून गेल्या कधिच चांदण्या
सुटला पहाट वारा
स्वप्नातुन हो सावध सखया
नको आता इशारा
जाग जागलो डाव रंगता अनोळखी प्रीतीचा
नवीन ओळख……..
भेट आज ही उरात रुजली
लेवून गंध सुखाचा
मोहविणाऱ्या सुरात सजली
घेऊन ठाव मनाचा
पुन्हा पुन्हा तनु राग आळवी अधीर स्पर्शाचा
नवीन ओळख……..
नकोत वचने नकोत शपथा
नजरेत धुंद हा ध्यास
अडखळणारी तुझी पाऊले
वळतील हा विश्वास
आठवण येता घेईन शेला पांघरून लाजेचा
नवीन ओळख…
बहरुन येण्या ऋतू कशाला
फुलवू रोज वसंत
आपसुक ये चाहूल जीवाला
उभी सख्या दारात
विसरु नको तू विडा उचलला प्रीतीच्या पैजेचा
नवीन ओळख पहा सांगतो ठसा चेहऱ्यावरचा
अरविंद