जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य, ज्येष्ठ लेखक कवी। सुधीर नागले यांची अप्रतिम काव्यरचना
काल मळ्यावर बरीच जमली गर्दी होती
त्यात मंडळी रसिक आणि दर्दी होती
सादर करण्या कविता उठलो होतो जेव्हा
बरेच गेले उठून त्यांची मर्जी होती
जपून केली कविता सादर तासभराची
रटाळवाणी झाली कारण सर्दी होती
टिका करावी असे वाटले नेत्यांवर पण
समोर खुर्चीवरती खाकी वर्दी होती
हळूच कानी बोलुन गेला सुत्रधार तो
बसा खालती अशीच त्याची अर्जी होती
महान आम्ही जुमानतो का कधी कुणाला ?
अजून वाचुन पुरी न झाली अर्धी होती
बरेच श्रोते उठून गेले नंतर कळले
बहुदा त्यांना कवितेची अॅलर्जी होती
— सुधीर नागले
गोरेगाव – रायगड