13 लाख 1 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त ;
शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
इचलकरंजी
इचलकरंजी येथे राज्य शासनाने बंदी घातलेला
गुटखा व सुगंधी तंबाखूची चारचाकी वाहनातून बेकायदेशीरपणे तस्करी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एकाला अटक केली. अशोककुमार देवडा या संशयित आरोपीस ताब्यात घेवून अटक केली. त्याच्याकडून छोट्या टेम्पोसह सुमारे 13 लाख 1 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर त्याचा साथीदार राजू पांडव हा फरारी झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर
पोलिस ठाण्यात दोघा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इचलकरंजी शहर व परिसरात अवैध व्यवसायाबरोबरच गुन्हेगारी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. यावर नियंत्रण आणताना पोलीस प्रशासनाला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. असे असतानाच इचलकरंजी शहरात
एका छोट्या टेम्पोतून चोरुन गुटखा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री बंडगर मळा परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ मिळालेल्या माहितीवरुन छत्रपती शाहु पुतळ्याच्या दिशेने निघालेला छोटा टेम्पो अडवला. त्या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी सुपारी, तंबाखुजन्य गुटखा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनचालक अशोककुमार देवडा याच्यासह टेम्पो व मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यामध्ये सुमारे 7 लाख 62 हजार 800 रुपयांची हिरा पान मसाल्याची 60 बाचकी, 1 लाख 87 हजार 620 रुपयांची महा रोयॉल 717 तंबाखुची 59 बाचकी, मोबाईल आणि साडेतीन लाखाचा टेम्पो असा सुमारे 13 लाख 1 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी अशोककुमार देवडा आणि राजु पांडव या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या पांडव याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक भालचंद्र देशमुख, उपनिरक्षक राजेंद्र यादव, कोळी, कांबळे, बाईत, बरगाले, माने यांच्या पथकाने केली.दरम्यान ,या कारवाईने अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.