जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ भारती महाजन रायबागकर यांची मुक्तछंद काव्यरचना
शीर्षक- मी मन…तुझंच मन
“अगं…ऐक ना…!
सुस्नात होतेस सुवासिक साबणाने…
नेसतेस नवनवीन वस्त्रप्रावरणे…
घालतेस सोन्या-मोत्याचे बहुमोल लखलखते दागिने…
माळतेस रंगीबेरंगी फुले सुगंधी…
लावतेस अत्तर कनोजी…
नयनी काजळ, अधरी लाली…
आणि रेखतेस बिंदी भाळी…
असा करतेस रोज शृंगार शरीराचा
एकदा जरा बघ माझ्याकडेही…
कर ना माझाही शृंगार…
आधी स्वच्छ कर जळमटं विकारांची…
मलिनता दूर कर क्षमेचा साबण लावुन…
निर्मळ, नितळ होऊ दे मला…
पोशाख चढव भरजरी सद्विचारांचा…
मग अनमोल दागिने घाल सद्गुणांचे, सुसंस्कारांचे, संवेदनांचे, सोज्वळतेचे…
फुलं माळ सौहार्दाची…
अत्तर लाव सौजन्याचं…
आणि अंतरंग दर्पणात बघुन टिळा लाव मानवतेचा…
बघ…असा परिपूर्ण शृंगार केल्यावर अष्टसात्विक भावांनी मुखकमल कसं फुलुन आलंय तुझं…
अगं…! कोण बोलतंय म्हणुन काय पुसतेस?
ओळखलं नाहीस?
मी तर…मन…तुझंच मन…!
सौ. भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334