शासकिय बंगल्याला ‘रत्नसिंधु’ नाव देणे हा जिल्हावासियांचा अपमान; जनता,शिवप्रेमींनी पेटून उठावे – मनसे
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे नाव शासकीय बंगल्याला देण्यास पालकमंत्री उदय सामंत यांना कमीपणा वाटतो का? किल्ले सिंधुदुर्ग नावाचे वावडे आहे का? असा जळजळीत सवाल मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. स्वत:च्या शासकीय बंगल्याचे नाव रत्नसिंधु असे दिले आहे.मुळात रत्नसिंधु नावाचा गड नाही व किल्लाही नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने जी भुमी पावन झाली आहे.तिचे पालकत्व मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे.महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी किल्ले सिंधुदुर्गचे भुमिपूजन आणि उद्घाटन ही महाराजांनी केले हे लक्षात ठेवावे.जगातील एकमेव महाराजांचे मंदिरही याच किल्यावर आहे.असे असताना आपण रत्नागिरी सिंधुदुर्गात येऊन जाऊन असल्याने नाव डावलणे आणि रत्नसिंधू नाव ठेवणे म्हणजे पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासीयांचा,नागरिकांचा,शिवप्रेमींचा तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याचा अपमान केला आहे.जिल्ह्यातील जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.म्हणूनच सिंधुदुर्ग अस्मिता दडपण्याच्या पालकमंत्री आणि ठाकरे सरकारच्या विरोधात तमाम शिवप्रेमी,सिंधुदुर्गवासियांनी रान उठवावे असेही आवाहन केले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला गड किल्ल्यांची नावे देण्याची मागणी केली होती. ही मागणी राज्य सरकारपुढे विचाराधीन होती. त्यानुसार सार्वजनिक आणि बांधकाम विभागाला मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे पत्रकही जारी करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यकारभार करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे . महाराजांचं नाव घेऊन जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केली जातेय. एकीकडे महाराजांच्या गड-किल्ल्यांवर धार्मिक अतिक्रमण केलं जात असताना ठाकरे सरकार राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांना गड किल्ल्यांची नावं देतंय. बंगल्याला नावं देण्याला विरोध नाही, तर मात्र तुम्ही खरे शिवभक्त असाल, मावळे असाल ते तुमच्या कृतीतून दाखवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक किल्ले आहेत. काही किल्ल्यांची नावे लोकांना माहीतही नाहीत किल्ले सिंधुदुर्गचीही पडझड होतेय. असेही काही किल्ले आहेत जिथे पोहोचण्यासाठी नीट वाट देखील नाही, सर्व किल्ल्यांवर महाराजांचा शूर इतिहास सांगण्यास कोणत्याही गाईडची व्यवस्था नाही.असे असताना मंत्री उदय सामंत आणि ठाकरे सरकार २० कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांना गड किल्ल्याची नावे देत आहेत.
म्हणूनच जिल्ह्यातील जनतेने,शिवप्रेमींनी,सिंधुदुर्गप्रेमींनी एकत्र येवून जिल्ह्याची अस्मिता दडपण्याच्या कृतीविरोधात रान उठवावे असेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर म्हटले आहे