You are currently viewing संदर्भ ग्रंथ:- जीवनविद्या समज- गैरसमज

संदर्भ ग्रंथ:- जीवनविद्या समज- गैरसमज

💡प्रश्र्न:- *जीवनविद्येचे तत्त्वज्ञान आगळेवेगळे आहे असे तुम्ही सांगता त्याबद्दल अधिक स्पष्टीकरण करावे ?*

 

✅ *सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर जीवनविद्येमध्ये सांगितलेले काही तुरळक सिध्दांत पूर्वी क्वचित प्रसंगी म्हणी रुपाने किंवा अन्य प्रकारे ध्वनीत केलेले आढळतील. उदाहरणार्थ, ‘पेरावे तसे उगवावे’, करावे तसे भरावे,’चिंती परा ते येई घरा’,अशा प्रकारच्या म्हणी आपल्या वाचनांत व ऐकिवात आहेत. त्याचप्रमाणे ‘उध्दरेदात्मनाऽऽत्मानम,’ हा किंवा ‘आत्मैव ह्यात्मनों बंधुरात्मैव रिपूरात्मनः’ हे गीतेतील सिध्दांत आपल्या वाचनात आहेत. अशा तऱ्हेच्या म्हणी किंवा सिध्दांत पूर्वी मांडले गेले असले तरी त्या म्हणींच्या किंवा सिध्दांताच्या पाठीमागचे शास्त्र (सायन्स) विशद केलेले नाही,परंतु हे कार्य जीवनविद्येने केलेले आहे. आत्मानुभव,तर्कशुद्ध पद्धती व वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या आधाराने हे जीवनविद्येचे शास्त्र निर्माण झालेले आहे.सर्वांना उपयुक्त अशी ही जीवनविद्या वास्तववादाचा स्वीकार करुन आदर्शवादाच्या मृगजळामागे धावायचे टाळते.त्याचप्रमाणे, वैयक्तिक, कौटुंबिक,सामाजिक,राष्ट्रीय व वैश्विक जीवन सुख-शांतीने फुलविण्याचे सामर्थ्य या जीवनविद्येत आहे. जीवनविद्येच्या तत्वज्ञानाचे आगळे-वेगळेपण विस्ताराने सांगणे प्रस्तुत छोट्या पुस्तकाच्या मर्यादेत शक्य नाही.परंतु हे वेगळेपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो-*

🎯 *”कुठल्याही परिस्थितीत व कोणावरही परमेश्वर कृपा किंवा कोप करीत नाही तर माणूसच स्वतःच्या बऱ्या वाईट कर्माप्रमाणे व निसर्ग-नियमांना अनुसरुन स्वतःवरच कृपा किंवा कोप करीत असतो,” हा जीवनविद्येचा सिध्दांत अत्यंत क्रांतीकारक आहे. कारण ‘परमेश्वर कृपा किंवा कोप करतो’ ही गैरसमजूत बहूतेक सर्व धर्मांचा पाया आहे.जीवनविद्येचा वरील सिध्दांत जर मानव जातीने स्वीकारला तर धर्मा धर्मातील तेढ व त्यातून निर्माण होणारे तंटे-बखेडे, दंगे-धोपे व युध्द लढाया अशा अनिष्ट गोष्टीना पायबंद बसेल.*

🎯 *जीवनविद्येचा दुसरा क्रांतीकारक सिध्दांत असा आहे. परमेश्वराने निर्माण केलेल्या अनंतकोटी ब्रम्हांडात जेथे आपल्या विश्वाला बिंदू इतकेही स्थान नाही तेथे माणूस या प्राण्याला व त्याच्याकडून घडणाऱ्या कर्मकांडांना परमेश्वराच्या दरबारात, काडीचेही स्थान नाही,हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. वास्तविक माणूस हा प्राणी परमेश्वराच्या खिजगणतीत सुध्दा नाही.अशा परिस्थितीत परमेश्वर मानवजातीच्या उध्दारासाठी किंवा त्याला दुःखमुक्त व संकटमुक्त करण्यासाठी अवतार घेतो किंवा तो आपला ‘पुत्र’ किंवा प्रेषित किंवा देवदूत पृथ्वीतलावर पाठवितो असे सांगणे किंवा समजणे चूक असून वस्तुस्थितीला धरुन नाही. साधारणपणे अलौकिक व्यक्तींना ‘अवतार’ हे विशेषण समाजाकडून दिले जाते.*

🎯 *विश्वात देव भरलेला आहे व कर्ता-करविता तो आहे असे सांगण्यात व शिकविण्यात येते. जीवनविद्येला हे मान्य नाही. विश्वात देव भरलेला नसून चैतन्य भरलेले आहे व हे चैतन्य जीवरुपात विश्वात वास करुन आहे. त्याचप्रमाणे कर्ता-करविता परमेश्वर ही कल्पना चुकीची असून कर्ता-करविता आपणच आहोत कारण ‘जीव आणि देव’ किंवा ‘तो आणि मी’ दोन नसून एकच आहेत.*

🎯 *’निसर्गनियमांसहित, स्वयंचलित, स्वनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर’ अशी जीवनविद्येने व्यक्त परमेश्वराची व्याख्या केलेली आहे.या व्याख्येमुळे परमेश्वर ही संकल्पना सुस्पष्ट झाली व त्यामुळे परमेश्वरा संबंधी सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा,चुकीच्या कल्पना व गैरसमजुती गळून पडण्यास मदत झाली.नैसर्गिक,पद्धतशीर व्यवस्था या स्वरुपात परमेश्वर विश्वात सर्वत्र वास करतो.म्हणून विश्वात सर्वत्र जी दिव्य व्यवस्था आहे त्या दिव्य व्यवस्थेला विश्वात पाहणे म्हणजेच विश्वात देवाला पहाणे होय.थोडक्यात,देव म्हणजे मूर्ती,व्यक्ती किंवा नुसती शक्ती नसून ती एक दिव्य व्यवस्था आहे, असे जीवनविद्येने स्पष्ट करुन सांगितले आहे.*

🎯 *नियती ही कोणी अदृश्य व अज्ञात शक्ती असून ती मानव जातीचे नियंत्रण करुन तिच्या लहरींप्रमाणे ती माणसांना नाचवित असते,असा लोकांचा गैरसमज आहे.सत्य हे आहे की स्वतः माणूसच स्वतःच्या कर्मातून स्वतःची नियती निर्माण करीत असतो.कर्मांच्या द्वारे माणूस जेव्हा निसर्गनियमांना गती देतो तेव्हा त्या गतीतून जी निर्मिती होते त्या निर्मितीला ‘नियती’ असे म्हणतात आणि माणसानेच निर्माण केलेली नियती त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरत असते.थोडक्यात, परमेश्वर माणसाच्या जीवनात कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ करीत नाही,तर माणूसच स्वतःच्या बऱ्यावाईट कर्मांनी स्वतःचे सुख-दुःख निर्माण करीत असतो असे जीवनविद्येने स्पष्टपणे सांगितले आहे.*

🎯 *प्रारब्धभोग भोगूनच संपवायचे असतात अशी लोकांची ठाम समजूत आहे परंतु हे जीवनविद्येला मान्य नाही.विशिष्ट अभ्यासाने व प्रक्रियेने प्रारब्धभोगांना सौम्य किंवा निष्प्रभ करुन क्रियमाणाच्या व्दारे अनुकूल नियती निर्माण करुन माणसाला स्वतःचे नशीब स्वतःलाच घडविता येते.म्हणूनच ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असे ठामपणे सांगून तुझे जीवन शिल्प सर्वांगाने सुंदर व सुरेख कसे घडवायचे याचे अचूक मार्गदर्शन जीवनविद्या करते.*

🎯 *सर्वसाधारणपणे लोक ज्याला षड़विकार असे म्हणतात ते षड़विकार नसून मुळातच सहा प्रेरणा असून त्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहेत,हे जीवनविद्येने प्रथमच सांगितले.या सहा प्रेरणा सोडायच्या नसतात किंवा मारायच्या नसतात तर विशिष्ट अभ्यासाने व प्रक्रियेने त्यांचा विकास करुन शेवटी त्यांचे परिवर्तन सद्गुणात करायचे असते. हा अभ्यास कसा करायचा व ही प्रक्रिया कशी साधायची याचे मार्गदर्शन जीवनविद्या करते.*

🎯 *आपली गृहलक्ष्मी ही ऐश्वर्य लक्ष्मीला आमंत्रण देणारी महालक्ष्मी आहे,व ज्या घरातील स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य आणि दुःख कायम वास करतात असे शिकवून पुरुषांना स्त्रियांचा सन्मान करण्यास जीवनविद्येने प्रवृत्त केले.*

🎯 *अनिष्ट व भ्रष्ट मार्गानी संपादित केलेला पैसा ही लक्ष्मी नसून कडकलक्ष्मी आहे व भविष्यात तीच माणसाला कडक शिक्षा भोगायला लावते. त्याच्या उलट इष्ट व चांगल्या मार्गाने मिळविलेला पैसा ही ‘महालक्ष्मी’ असून भविष्यात तीच माणसाला सुख,शांती,समाधान प्राप्त करुन देण्यास कारणीभूत ठरते. जीवनविद्येच्या या सिध्दांताचे मानव जातीने स्वागत केल्यास तो सिध्दांत व्यक्तीच्या कुटुंबाच्या समाजाच्या व राष्ट्राच्या दृष्टीने हिताचा ठरुन मानव जातीची सर्वार्थाने प्रगती साधण्यास कारणीभूत ठरेल.*

🎯 *जीवनविद्या मेल्यानंतरच्या काल्पनिक मोक्षाचा विचार करीत नाही तर या जन्मीच माणसाला मोक्ष कसा मिळेल याचे मार्गदशन करते. जीवनाचे गणित सुटणे म्हणजे मोक्ष असे जीवनविद्या सांगते.*

🎯 *”काम करण्यासाठीच माणसाला पोट आहे” असा अत्यंत महत्त्वाचा आगळावेगळा सिद्धांत जीवनविद्येने सांगितला. ‘कामासाठीच पोट’ हा दिव्य नैसर्गिक व्यवस्थेचाच एक भाग आहे. पोटच नसते तर कोणीही काम केले नसते, परंतु पोट भरण्यासाठी मात्र प्रत्येकाला काम करणे भागच पडते. पोट भरण्यासाठी विविध प्रकारची माणसे,विविध प्रकारची कामे करीत असतात व त्यामुळेच जगाचे रहाटगाडगे व्यवस्थित चाललेले आहे.म्हणून आवडीने व प्रामाणिकपणे काम करणे, हे निसर्ग-नियमांशी सुसंगत असल्यामुळे तसे करण्याने माणसाची सर्वांगीण प्रगती होते व तसे न केल्याने माणसाची अधोगती होते, अशी जीवनविद्येची शिकवण आहे.*

🎯 *जीवनविद्येचे तत्त्वज्ञान हे निवृत्तीप्रधान नसून प्रवृत्तीप्रधान आहे.अंतर्मुख होण्याऐवजी समाजाला व विश्वाला अभिमुख होण्यास जीवनविद्या शिकविते. याचे प्रमुख कारण असे की, माणसाची सर्व इंद्रिये ही स्वभावतःच बहिर्मुख आहेत. इंद्रिये बहिर्मुख असणे हासुद्धा दिव्य नैसर्गिक व्यवस्थेचाच एक भाग आहे. स्वभावतः बहिर्मुख असणाऱ्या इंद्रियांना जबरदस्तीने अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वभावतः बहिर्मुख असणाऱ्या इंद्रियांना सहजपणे समाजात व विश्वात ‘दिव्य व्यवस्था रुपात’ असलेल्या परमेश्वराला* *पाहायला जीवनविद्या शिकविते. त्याचप्रमाणे, ध्यान धारणा करण्याची आवड असणाऱ्या जिज्ञासू साधकांना अंतर्मुख होऊन हृदयस्थ ईश्वराचा साक्षात्कार कसा करुन घ्यायचा हेसुद्धा त्यांना दिव्यसाधना देऊन शिकविले जाते.*

🎯 *अनेक लोकांना रोजगार देणारा ‘उद्योग हा सर्व श्रेष्ठ योग आहे’ असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. कष्ट करण्याची ज्यांची तयारी आहे अशा तरुणांना उद्योगात यश मिळविणे कठीण नाही. नोकरीच्या पाठीमागे न धावता तरुणांनी उद्योजक व्हावे, उद्योगपती व्हावे व राष्ट्राला धनवान व बलवान करुन प्रगतीपथावर न्यावे, अशी जीवनविद्येची तरुणांना शिकवण आहे.*

_*तात्पर्य,जीवनविद्या म्हणजे, जीवनाचे शास्त्र असून सुखी व यशस्वी जीवन जगण्याची कला आहे.वर म्हटल्याप्रमाणे जीवनविद्येचे वेगळे आगळेपण अधिक विस्ताराने या छोट्या पुस्तकात सांगणे शक्य नाही, म्हणुन आमची प्रकाशीत झालेली अन्य पुस्तके वाचकांनी अभ्यासपूर्वक वाचावीत,अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे.*_

*🙏श्री सद्गुरु वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा