You are currently viewing विश्वबंधुत्वाचे पहिले बीज रोवणारी महान विभूती म्हणजे स्वामी विवेकानंद होय– डॉ.सुरज शुक्ला

विश्वबंधुत्वाचे पहिले बीज रोवणारी महान विभूती म्हणजे स्वामी विवेकानंद होय– डॉ.सुरज शुक्ला

कुडाळ:

विश्वबंधुत्वाचे बीजारोहण करणारी,युद्ध नको परस्परांना साहाय्य करा. जगतामध्ये मैत्री करा. असा संदेश देणारी विश्व पूजनीय विभूती म्हणजे स्वामी विवेकानंद होय. असे उद्गार बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरेपी चे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला यांनी काढले .ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रमात तर्फे आयोजित स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते .त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आजच्या पिढीने स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून समाजासाठी, देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहिले पाहिजे .त्यांनी त्यांच्या युवा अवस्थेमध्ये जे कार्य केले तसे कार्य करण्याची जिद्द मनात बाळगली पाहिजे. तरच देश प्रगती करू शकतो, असे सांगत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे कार्य  उपस्थितांसमोर कथन केले.

यावेळी व्यासपीठावर महिला महाविद्यालय व रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बीएड महिला महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे ,नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर संस्थेच्या एच आर ओ पियुशा प्रभू तेंडुलकर हे उपस्थित होते .

१२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते .स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केल्यानंतर उपस्थितांनी मनोगतं व्यक्त केली. त्यामध्ये अरुण मर्गज यांनी “विश्व बंधुत्व व विश्व मानवता यांची शिकवण देत. मैत्री व शांतता जगाला विनाशापासून वाचवू शकते‌. या स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीची आजच्या काळात फार गरज आहे. कलह न करता मैत्रीपूर्ण संबंधातून आपण आपला विकास करू शकतो हे प्रत्येक देशाने लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या धर्माची अवहेलना न करता आपल्या धर्मातील तत्व, मूल्य यांची जोपासना केल्यास धार्मिक संघर्ष होणार नाहीत. जग-देश एकोप्याने, एकदिलाने नांदेल असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद भारत खरे भारत भूषण होत. ज्यांनी अमेरिकन जनतेला व जगातील सर्व मानवतेला बंधुभावाची शिकवण दिली त्या शिकागो येथील धर्म परिषदेतील रोमहर्षक प्रसंगाची उपस्थितांना आठवण करून दिली.

विशेष म्हणजे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण संस्थेचे मधील विविध अभ्यासक्रमातील ज्या युवक-युवतींनी वर्षभरामध्ये दैदिप्यमान कार्य केलेले आहे त्यामधील राष्ट्रीय विभागीय स्तरावर बॅडमिंटन क्रीडाप्रकारात वैशिष्ट्यपूर्ण काम करणारी सबा शेख ,आय आय टी ची परीक्षा उत्तीर्ण केली तो साहिल शशांक आटक, माली नावाच्या शॉर्ट फिल्म मध्ये नेत्रदीपक अभिनय करणारा साहिल सातार्डेकर ,लॉकडाउन काळात मुक्या प्राण्यांची शुश्रुषा करणारा फिजिओथेरपी महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्ष वाघमारे, बी.एड प्रथम वर्षांमध्ये प्रथम आलेली धनश्री वाटवे ,प्राजक्ता परब , राष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्येमध्ये जिचं आर्टिकल प्रसिद्ध झाला ती गायत्री रेड्डी ,जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेली ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी निकिता मयेकर या सर्वांना भेटवस्तू व नाथ पै यांच्या जीवनावर चे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात व कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियुशा प्रभू तेंडोलकर, प्रास्ताविक परेश धावडे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तसेच विविध विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा