You are currently viewing एसटीचे स्टेअरिंग आता देणार सेवानिवृत्त चालकांच्या हाती

एसटीचे स्टेअरिंग आता देणार सेवानिवृत्त चालकांच्या हाती

सिंधुदुर्ग विभागातील सेवानिवृत्त ३५ जणांची यादी तयार!

कणकवली

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे , या एकमेव मुद्यावर सिंधुदुर्गात सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आता साठ दिवस पूर्ण झाले आहेत . प्रशासनाच्यावतीने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर हजर होत नसल्याने सेवानिवृत्त चालकांना पुन्हा कामावर हजर करून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील विनाअपघात सेवा बजावलेल्या व प्रशासनाच्या निकषात बसणाऱ्या ३५ सेवानिवृत्त चालकांची यादी तयार करण्यात आली आहे . कामबंद आंदोलनामुळे एसटीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने पर्याय म्हणून एसटीचे स्टेअरिंग सेवानिवृत्तांच्या हातात देण्याचे निश्चित केले आहे . मात्र , सेवानिवृत्तांना हजर करून घेताना काही अटी निश्चित केल्या आहेत . सिंधुदुर्ग विभागात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने पुन्हा कामावर हजर होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर आपण कामावर हजर झालो तर संपकरी कर्मचाऱ्यांचा रोष आपल्याला सहन करावा लागेल. अशी भीती काही निवृत्त चालकांना वाटत आहे. तर सेवानिवृत्तांना हजर करून घेऊन एसटी वाहतूक रुळावर आणण्यासाठी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत . ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

यांनाच मिळणार नोकरी !

– अठ्ठावन्न वर्ष ते बासष्ट वर्ष पूर्ण होण्यास सहा महिने कमी असणाऱ्यांनाच एसटीत नोकरी मिळणार आहे .
– आरोग्यदृष्ट्या तपासणी करून सक्षम असणाऱ्यांनाच नियुक्ती दिली जाणार आहे . त्यामुळे फीटनेस महत्वाचा आहे .

महिन्याचा पगार २० हजार रुपये!

सेवानिवृत्त चालक – वाहकांना वीस हजार रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले आहे .
– एका महिन्यात सव्वीस दिवस काम करणाऱ्यांनाच वीस हजार रुपये मानधन मिळणार आहे. मात्र, गैरहजर राहिलेल्या दिवसांचे वेतन कापले जाणार आहे .

जिल्ह्यातील सेवानिवृत्त ३५ चालकांची यादी निश्चित केली आहे. त्यापैकी एका सेवानिवृत्त चालकाने हजर होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सेवानिवृत्तांना हजर करून घेत असताना , महामंडळाच्या सूचनेचे पालन केले जाणार आहे . विभागीय वाहतूक अधिकारी एल.आर.गोसावी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा