दिव्यांग निधी प्राधान्य क्रमाने तालुका निहाय मंजूर करा
– पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील 5 टक्के दिव्यांग सेस निधी तालुका निहाय प्राधान्य क्रमाने मंजूर करावा अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. 5 टक्के दिव्यांग सेसे निधीच्या नियंत्रणासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची आज जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये बैठक झाली.
यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, प्रभारी समाज कल्याण अधिकारी शाम चव्हाण, अशासाकीय सदस्य शेखर आवळे, रमेश गुरव आदी उपस्थित होते.
दिव्यांगांचे प्रस्ताव जसे येतील तसे प्राधान्य क्रमाने मंजूर करावेत, असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, दिव्यांगांना वाटप करावयाच्या वाहनांबाबत तसेच एकत्र कुटुंबातील दिव्यांग लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळावा, यासाठीच्या अटी व शर्तींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. हा बदल धोरणात्मक असून त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशी सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.