सावंतवाडी
कोरोनाचे संक्रमण पुन्हा संपूर्ण देशात जाणवू लागल्याने शासनाच्या निर्देशांनुसार सावंतवाडी येथे २९ जानेवारीला होणारे सोळावे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र, संमेलनानिमित्त आयोजित केलेली महिलांसाठीची काव्यलेखन स्पर्धा ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
संमेलनाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असतानाच कोरोनाचे संक्रमण पुन्हा संपूर्ण देशात जाणवू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे दक्षता घेणे गरजेचे असल्याने कवयित्री संमेलन स्थगित करण्यात आले आहे. कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर संमेलनाची पुढील तारीख निश्चित करण्यात येईल. याची सर्व साहित्यप्रेमी, लेखक व कवयित्रींनी नोंद घ्यावी, अशी विनंती आयोजक संस्थांच्या वतीने ‘आरती’ मासिकाचे संपादक प्रभाकर भागवत व मुख्य आयोजक प्रतिनिधी उषा परब यांनी केली आहे. दरम्यान, संमेलनाच्या निमित्ताने ‘आरती’ मासिकने आयोजित केलेली महिलांसाठीची काव्यलेखन स्पर्धा ठरल्याप्रमाणे होणार असून कविता पाठवण्याची अंतिम तारीख १८ जानेवारी राहील, असे कवयित्री, लेखिका उषा परब यांनी कळविले आहे.