*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या लेखिका, कवयित्री अर्चना मुरुगकर यांची काव्यरचना*
पहाटे रवीने दिसावे पुन्हा
मनाला धुमारे फुटावे पुन्हा
सुरांनी नहावे अभंगातुनी
मनाच्या मळाला धुवावे पुन्हा
सख्याने नव्याने जरा पाहता
कितीदा स्वत: मोहरावे पुन्हा
इशारे तुझे टाळते मी जरी
नवे भास होता हसावे पुन्हा
मुलांच्या यशाचा दिसे गारवा
जगी बाप थोडा सुखावे पुन्हा
सवे राहताना दिसे गोडवा
कसे तोडताना छळावे पुन्हा
मुलींना नटाया नको वाटते
जगी सिद्ध करण्या मरावे पुन्हा
सौ.अर्चना रमेश मुरुगकर
तळेगाव दाभाडे, पुणे.
9762863231
archanamurugkar@gmail.com