फोंडाघाट बाजारपेठेत व्यापाऱ्यांचे दुहेरी मरण
महाराष्ट्र राज्यात कोरोनाची तिसरी लाट थैमान घालते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकट जनतेसमोर येऊन ठेपले आहे. फोंडाघाट ही कणकवली तालुक्यातील मोठी व्यापारी पेठ. आजूबाजूच्या खेड्यातील लोक हे फोंडाघाट बाजारपेठेवर अवलंबून आहेत. परंतु बाजारपेठेत होत असलेले प्रचंड ट्रॅफिक आणि कोरोनाची भीती यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे तोंड फिरवल्याचे दिसत आहे.
एकीकडे लॉक डाऊन ची टांगती तलवार तर दुसरीकडे फोंडा बाजारपेठेत होणारी मोठ्या गाड्यांची गर्दी आणि ट्रॅफिक यामुळे लोक देखील बाजारपेठेत खरेदीला जात नाहीत त्यामुळे व्यापारी वर्ग व्यापाराविना हवालदिल झाला आहे.
फोंडाघाट व्यापारी संघाचे अध्यक्ष स्व.सुदन बांदिवडेकर यांच्या निधनानंतर अध्यक्ष पद रिक्त असल्याने व्यापाऱ्यांच्या व्यथा शासन दरबारी कोणीच मांडत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत व्यापाऱ्यांची होणारी दुहेरी कुचंबना याबाबत कणकवली प्रांत यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लावली आहे. जिल्ह्यातील इतर घाट रस्ते अवजड वाहतुकीसाठी बंद असल्याने कोल्हापूर पुणे आदी ठिकाणी होणारी अवजड वाहतूक फोंडामार्गे वळविण्यात आल्याने बाजारपेठे वर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. फोंडा बाजारपेठेतून अवजड वाहतूक सुरु असल्याने आधीच अरुंद असणाऱ्या रस्त्यावर ताण येऊन वाहतूक कोंडी निर्माण होते.
बाजारपेठेवर वाहतूक कोंडी आणि भविष्यातील लॉक डाऊन ची भीती यामुळे बराच फरक पडला असून लोकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याने बाजारपेठेतील वाहनांची कोंडी टाळण्यासाठी फोंडा बाजारपेठेत २ पोलीस अथवा होमगार्ड तैनात ठेवावेत तरच वाहतूक सुरू राहील, आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार तसेच यात प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यास येत्या ३० जानेवारी नंतर कधीही आंदोलन केले जाईल असा इशारा फोंडाघाट येथील अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.