*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांचा सरत्या वर्षाला निरोप देणारा अप्रतिम लेख*
*कालनिर्णय*
*बारा पाने..*
वर्ष संपलं.काळाचं एक पाऊल पुढे गेलं.३१डीसेंबर २०२१…शेवटचा दिवस.काळाच्या फडफडणार्या पानांबरोबर भिंतीवरचं कॅलेंडरही फडफडलं!!
खरं म्हणजे “भिंतीवरी कालनिर्णय असावे….!!”
या माध्यमातील काव्यपंक्तीनेच आपलं नव वर्षं
सुरु होतं…….
“कालनिर्णय “हा घरातला पाहुणा नव्हे तर तो आपल्या परिवाराचा महत्वाचा घटक आहे!!वर्षाचे तीनशे पासष्ट
दिवस आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा सहभाग असतो.
सुट्ट्या ,सोहळे, व्रते, ऊपास,प्रवास, जयंत्या,पुण्यतिथ्या वैयक्तिक टिपणे…..
अशा अनेक बाबींची स्मरण यादी म्हणजे कालनिर्णय.
वर्षभर तो, दिनविशेष सांगतो.शुभअशुभाचे सावधान
ईशारेही देतो. “माझा नाही बुवा विश्वास..”” असं म्हणत,
कालनिर्णयमधील राशीभविष्य गंमत म्हणून का होईना
वाचलं जातंच.पाककृतीसाठी विवीध माध्यमे ऊपलब्ध असली तरीही कालनिर्णयच्या महिन्यामागचं पान वाचणं
हा गृहिणींचा आनंदच…!!संपूर्ण साहित्यमित्र..
३६५व्या दिवशी या मित्राचा सहवास संपतो….
भिंतीवरच्या खिळ्यातून कालनिर्णय काढलं,नव्या कोर्या ,नववर्षाच्या कालनिर्णयाची घट्ट गुंडाळी ऊलगडली आणि त्याच जागी ही नवी दिनदर्शिका लावली….
जुनं काढतांना मनात आलं,”या वर्षानं खूप सतावलं..
शिकवणही दिली….”नवं लावताना ,मनांत आशा पालवली.सारी ईडा पीडा जुन्याबरोबर जाऊदे…”
हातातल्या जुन्याची पानं फडफडली..क्षणांत अनेक
चौकोनात केलेले शाईचे गोल दिसले.स्वअक्षरांतील टिपणे दिसली.खरं म्हणजे सारं काही होऊन गेलेलं होतं!!
आता होती ती रद्दी!!..ऊगीच भास झाला…चुरगळलेली पानं म्हणत होती…”गरज सरो वैद्य मरो..!!हेच ना शेवटी…
वर्षभर तुझ्या पावलांबरोबर चाललो..साधं धन्यवादही नाही? कचर्याच्या टोपलीतला पुढचा गलिच्छ प्रवास सुरू होण्यापूर्वी थोडं मनांतल.!
वाईट नक्की कसलं वाटतंय् ?या घरातलं वास्तव्य संपल्याचं की खड्यासारखं दूर भिरकावून दिल्याचं…?”
पण शेवटचं पान धीर गंभीर होतं.अधिक परिपक्व ,गंभीर ,विचारी….
त्यानं दिलासा दिला.अग!मी कालनिर्णय आहे.कालाचे निर्णय ठरलेलेच असतात. कुठलीही स्थिती स्थिर नसते.
जुनं जातं.नवं त्या जागेवर येतं..झाडावरची पानं नाही का गळत?तेव्हांच नवी पालवी फुटते.अन् जीवन पु न्हा बहरतं!!नव्या आशा ..नवी ऊमेद…जुन्याला निरोप ,नव्याचे स्वागत..!!
तुझी भिंत सोडून जाताना मीही ऊदास आहेच!
All partings in life are sad indeed..
पण मी तुझ्या स्मृतीत असेनच..निरोपाचा हात हलवताना
इतकंच म्हणेन,”नव वर्षाच्या खूपखूप शुभेच्छा!!
शुभास्ते पंथान:….!!!
धन्यवाद “कालनिर्णय २०२१”
*सौ. राधिका भांडारकर*
*पुणे*.