You are currently viewing सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ

प्रा.दिलीप सुतार, कुरुंदवाड यांनी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना वाहिलेली काव्यमय श्रद्धांजली.

‘वर्ध्याची –
*वनवासी सुकन्या*
सिंधुताई सपकाळ तू …
निराशेच्या काळोखी
दडलेल्या
हजारो काजव्यांसाठी
आश्वासक प्रसन्न सकाळ तू…
छत्र हरवल्या अनाथांचा
प्रेरणादायी उष:काल तू …

यशोदेच्या जगावेगळ्या मातृत्वाचा
स्वैर-वैश्विक अनुवाद तू …
सासर माहेरच्या –
अव्यक्त वेेदनांचा
नित्य हसरा,
वंदनीय ऋग्वेद तू …

रंजल्या गांजल्या स्त्रीत्वाची
धीरोदात्त कहाणी तू …
ग्यानबा तुकोबाची व्यवहारी पथदर्शी अभंगवाणी तू …
वाहे गुरू नानकांची
चिरंतन प्रेमळ गुरूबाणी तू…

कबीराचा –
मर्मस्पर्शी दोहा तू ….
मीर -खुसरो- गालीबची
दर्दभरी शेरो – शायरी तू .!
ओठी वसे नित्य भटांची गझल
लिहावे चरित्र तुझे
काळाने पुन्हा सुवर्णाक्षरी …
अशी
माणुसकीची भक्कम पायरी तू ..!

पोरक्या मुला-मुलींसाठी
आभाळ कवेत घेणारी…
*नकुशी -चिंधी* ते…
*डॉ.पद्मश्री सिंधुताई*
अशी दैदिप्यमान इतिहास निर्माती तू…!
नतमस्तक व्हावे भल्याभल्यांनी –
अशी महान
‘महानुभाव साधक’
अनाथांची ‘माई’…#
सिंधुताई सपकाळ तू…!!!

*प्रा. दिलीप सुतार*
*कुरूंदवाड*
मो. नं 9552916501

प्रतिक्रिया व्यक्त करा