सिंधुदुर्गनगरी :
जिल्ह्यातील सव्वा दोन लाख घरांमध्ये मास्क व सॅनिटायझर प्रशासनामार्फत वाटप करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज जिल्ह्यातील माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा ऑनलाईन आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार पाटील, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वैशाली राजमाने आदी सहभागी झाले होते.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहीम असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, या मोहिमेमुळे लोकांमध्ये चांगली जनजागृती झाली आहे. आजूनही लोकांमध्ये चांगली जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. एक दिवस संपूर्ण जिल्ह्यामध्ये चळवळ स्वरुपात ही मोहिम राबवावी. ही मोहिम राबवत असताना वेगवेगळे गट जसे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा एक गट, पोलिसांचा एक गट, आरोग्य कर्मचारी यांचा गट असे गट तयार करून कार्यवाही करावी. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळात पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचे वाटप करत असताना मतदार संघ निहाय नियोजन करावे. नगर परिषदांकडे त्यांच्या गरजे इतके साहित्य व पंचायत समिती स्तरावर त्यांना लागणारे साहित्य पोहचवावे. या वाटपाचे उद्घाटन त्या त्या मतदार संघातील आमदार महोदयांनी करावे अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.
मास्त न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करावी
बऱ्याच वेळा लोक मास्कचा वापर न करता घरा बाहेर पडत असल्याचे दिसून येते. आशा मास्क न वापरणाऱ्यांवर प्रशासन व पोलीस यांनी कडक कारवाई करावी. ही कारवाई दंडात्मक व पोलीस आशा दोन्ही स्वरुपाची असावी आशा सूचन देऊन पालकमंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले की, सध्या राज्यासह जिल्ह्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे. कोविड – 19 या आजारातून लोक बरे होतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. पण, लोकांनी या आजारापासून वाचण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क व सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर पाळणे हे गरजेचे आहे. तसेच काही लक्षणे जाणवल्यास तातडीने तपासणी करून घेणेही तितकेच गरजेचे आहे. कोविडच्या संकटाचे संधीत रुपांतर करून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगली करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत. सध्या जिल्ह्याला रुग्णवाहिका व शववाहिका पुरवण्यात येणार आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सुधारणे, आडाळी येथील आयुष्य रुग्णालय याविषयीचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत. पोलिसांनी पोलीस रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्ह्यातील माझे कुटंब माझी जबाबदारी या मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती, प्रयोगशाळा तपासणीची स्थिती, सध्याची कोविडची परिस्थिती, आरोग्य यंत्रणा व तपासणीसाठी नेमण्यात आलेली पथके व त्यांच्याकडील साहित्य यांचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सविस्तर आढावा सादर केला. तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी जिल्हा परिषदेचा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी आरोग्य यंत्रणेचा आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांनी पोलीस विभागाचा आढावा सादर केला. तसेच यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी सर्व विभागांच्या समस्याही जाणून घेतल्या.