You are currently viewing आपल्या खाजगी रुग्णालयाचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय?

आपल्या खाजगी रुग्णालयाचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय?

आमदार वैभव नाईक यांचा सवाल

सिंधुदुर्ग

गेले सात ते आठ महिने सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाची बदनामी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी करत आहेत. परंतु वस्तुस्थिती पाहता अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातुन बरे होऊन घरी गेलेत, त्यात सामान्य नागरिक व्यापारी,उद्योजक व मी सुध्दा आहे.नितेश राणेंचे अनेक पदाधिकारी, इंजिनिअरिंग कॉलेजचे कर्मचारी यांनी सुध्दा याच रुग्णालयात उपचार घेतले.कोविड पॉझिटिव्ह आलेल्या काहींचा दुर्दैवाने मृत्य झाला.आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर,अधिकारी,नर्स कर्मचारी रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र गेले सात आठ महिने प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या सर्वांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण नितेश राणेंनी मुंबई बसून केले आहे.पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर हे जिल्ह्यात वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहेत.जिल्हा रुग्णालयातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र उशिराने कोविडसाठी बेड दिलेल्या आपल्या खाजगी हॉस्पिटलचा व्यवसाय वाढविण्यासाठी व राजकीय फायद्यासाठी नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी शासकीय आरोग्य व्यवस्थेची बदनामी करत आहेत काय? असा सवाल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.

आ.वैभव नाईक पुढे म्हणाले, जिल्हा रुग्णालयात आवश्यक असलेली औषधे उपलब्ध आहेत.रेमडेसिवीर सारखी महाग व राज्यात तुटवडा असलेली ४५० इंजेक्शन आपल्या जिल्ह्यात सध्या उपलब्ध आहेत. लवकरच अजून १ हजार इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत.जिल्हा रुग्णालयात टेस्ट संख्या वाढत आहे.स्वतःचा ऑक्सिजन प्लांट येणाऱ्या दोन दिवसांत सुरू होणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये पहिल्यांदाच ९१ बीएएमएस डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीचे अधिकार आता जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या आहेत. मध्यंतरी आमचे काही शासकीय डॉक्टर व कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयावर ताण येत होता.मात्र कोविड वर मात करून आमचे डॉक्टर पुन्हा एकदा सेवेत रुजू झाले आहेत.रूग्णांना चांगले उपचार मिळत आहेत. ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे.रुग्णांना जेवणाची सोय उत्तम आहे.कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यकींच्या अत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीचा प्रश्न सोडविण्यात आलेला आहे.त्याबाबतची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, खासदार हे सातत्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत.ज्या अडचणी येत आहेत त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रातील जी मोठी खाजगी हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये कोविड झाल्यानंतर पहिल्या महिन्यापासूनच रुग्ण सेवा सुरू करण्यात आली.मात्र राणेंनी आपले खाजगी रुग्णालय कोविड साठी देणार असा गाजावाजा करून गेले 7 महिने त्याबद्दलची कार्यवाही केली नाही.राणेंच्या नाकर्तेपणाचा फटका त्यांच्या सुदन बांदिवडेकर या कार्यकर्त्यांला बसला.जिल्हा रुग्णालयात चांगले उपचार मिळत नाहीत असे राणे करत असलेल्या बदनामीमुळे बांदिवडेकर यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यास उशिर केला. सुदन बांदिवडेकर कोरोनाशी झुंज देत होते तेव्हा नितेश राणे सुशांतसिंह प्रकरण व आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात व्यस्त होते.राणे आपल्या कार्यकर्त्यांना व कर्मचाऱ्यांनाही आपल्या हॉस्पिटलचा आधार देऊ शकले नाहीत. जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात मोफत रुग्णसेवा दिली काहींनी आपल्या रुग्णालयात कोविड१९च्या रुग्णांवर उपचार सुरू केले. त्यामुळे नाईलाजाने राणेंना आपल्या रुग्णालयातील काही बेड कोविड साठी द्यावे लागेले.सुरुवातीपासून त्यांनी आपल्या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरु केले असते तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना मिळाला असता. मात्र त्यांच्या रुग्णालयात किती पेशंट उपचार घेत आहेत. किती पेशंट बरे झाले हे नितेश राणेंनी आता जनतेसमोर जाहीर करावे.
राणेंनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार असताना जिल्हयातील आरोग्य यंत्रणा न सुधारता आपले खाजगी मेडिकल कॉलेज उभारले त्यातून जिल्हावासीयांना चांगल्या सुविधा मिळतील असे गाजर दाखविण्यात आले.मात्र कोरोनाच्या महामारीत मात्र हे रुग्णालय रुग्ण सेवेपासून अलिप्त ठेवण्यात आले ही वस्तुस्थिती आहे. आणि ती वस्तुस्थिती नितेश राणे स्वीकारणार आहेत का?
यापुढच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.याबाबत लवकरच सर्वपक्षीय बैठक पालकमंत्री उदय सामंत घेतील. आरटीपीसीआर लॅब वेळी देखील राणेंनी असेच राजकारण केले. भाजपच्या आमदारांच्या आमदार निधीतून (अर्थात शासनाचे )पैसे घेऊन राणेंनी आपल्या रुग्णालयात कोविड१९ लॅब सुरू केली.शासनाचे पैसे वापरुन सुद्धा राणे जिल्हावासीयांना कोविड टेस्ट मोफत देऊ शकलेले नाहीत.त्यातही आर्थिक व्यवहार त्यांनी सुरु ठेवला.त्यांच्या रुग्णालयात किती रुपये दिल्यावर कोविड टेस्ट केली जाते हे ही एकदा राणेंनी जाहीर करावे.
एकीकडे जिल्हा रुग्णालयात उभारलेल्या आरटीपीसीआर लॅबच्या माध्यमातून आतापर्यंत 22 हजार कोविड टेस्ट मोफत झाल्या आहेत. तर दुसरीकडे राणेंच्या हॉस्पिटलमध्ये लॅबसाठीचे 1 कोटी रु शासनाने देऊन सुद्धा लोकांना कोविड टेस्ट साठी पैसे मोजावे लागतात. जिल्हा आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर कर्मचारी यांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण सहकार्य आहे. नितेश राणे आपण वैदयकीय अधिकारी असल्याप्रमाणे एक एक सल्ला देत होते मात्र त्यांनी प्लाझ्मा थेरपीचा दिलेला सल्ला फोल ठरला आहे.आयसीएमआर ने प्लाझ्मा थेरपी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.कोल्हापूर येथे प्लाझ्मा थेरपी बंद करण्यात आली आहे.
नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी आपल्या पक्षाच्या गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी नेहमी भेटत असतात. गोवा राज्याने सिंधुदुर्ग मधील रूग्णांवरील रुग्ण सेवा पूर्णपणे बंद केली आहे. या रुग्णसेवेसाठी महाराष्ट्र सरकार गोवा सरकारला उपचाराचे पैसे वेळेवेळी देत होते. त्यामुळे नितेश राणे व सहकाऱ्यांनी जिल्ह्यात आरोप करण्यापेक्षा गोवा रुग्णालयात सिंधुदुर्गमधील रूग्णांवर उपचार करण्यासाठी पाठपुरावा करावा.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईस्थित चाकरमान्यांना मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग व कोकणात न जाण्याचे आवाहन केले होते.मात्र मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यामुळे राणे व भाजपच्या मंडळींनी मुद्दाम लोकांना कोकणात येण्याचे आवाहन केले.त्यामुळे गेल्या काही दिवसांत मुंबई व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे नितेश राणे यांच्या टिकेकडे लक्ष न देता कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी वेळ जाऊ न देता जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत असे आवाहन आ.वैभव नाईक यांनी केले आहे.
खर तर आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही परंतु जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या होणाऱ्या बदनामीला वाचा फोडून लोकांमध्ये आरोग्य यंत्रेणेविषयी असलेला विश्वास कायम रहावा.नितेश राणे व त्यांचे भाजपचे सहकारी करत असलेल्या बदनामी मुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी हे प्रसिद्धी पत्रक काढल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा