You are currently viewing अनाथांची माय

अनाथांची माय

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांनी ^अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना वाहिलेली श्रद्धांजली

नवे वर्ष सुरु झाले आणि एका ध्यासपर्वाचा अस्त झाला. मन उदास झाले.नकळत एक पोरकी पोकळी मनात जाणवू लागली.
मृत्यु हे अंतीम सत्य आहे.राम गेले,
कृष्ण गेले ,अनेक विभूतीअनंतात विलीन झाल्या..जणू पृथ्वीतलावरचे त्यांचे अवतार कार्य संपले आणि ते निघून गेले.
सिंधुताईंच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल.
“..यांनी त्यांचे जीवन अर्पिले हो….”नकळत हेच उद्गार ओठावाटे बाहेर पडतात.
सिंधुताईंचा अचेतन ,शांत देह पाहतांना ,क्षणभर वाटले,या डोहातून शब्द झंकारताहेत…
“देखना एक दिन वक्ख्त भी तेरा गुलाम होगा।
मंझीले उन्हीको मिलती है,जिनके सपनोमे जान होती है..।।
संघर्षमय जीवनात त्यांनी चैतन्यमय स्वप्ने उराशी बाळगली…
त्यांचं बाळपण खडतर..यौवनात अवहेलना..
ऊपेक्षा ,लाथाडणं ,वणवण ,पायात काटे अन् डोक्यावर प्रखर उन हीच तिच्या जीवनाची खडबडीत वाट…पण ती चालली.निर्धाराने.धडाडीने.तिची जिद्द ,तिचा विश्वास,आणि धुक्यातली तिची स्वप्नं ,आणि नारीशक्ती हेच भांडवल.डोळ्यातून गळलेला एकेक अश्रु तिने जपून ठेवला .कारण त्या अश्रुंची तिला फुले करायची होती…त्या अश्रुंतूनच निर्माण झाले
विचारांचे मोती..जे तिला मिळालं नाही त्या प्रेमाचे मोती तिने उपेक्षित ,अत्याचारित,नाकारलेल्यांवर मनसोक्त उधळले…त्या अनाथांची ती माय झाली..
निराधारांची आधारस्तंभ बनली..
एक गर्भवती स्त्री गोठ्यात एका बालिकेला जन्म देते..दगडाने ठेचून तिची नाळ कापते..स्मशानातल्या चितेवर भाकरी भाजून स्वत:च्या दुग्धधारा जपते अन् आतल्या आत धुमसते ,पेटते ..एका युद्धासाठी तयार होते.
तिचं सोसणं तिला संपवत नाही तर घडवतं.
बळ देतं ,ताकद देतं..न्याय कुणाकडे मागायचा..
आपणच आपल्या जन्माचा न्याय करायचा ,या प्रेरणेने तिची कूसच रुंदावते…
ती एकाचीच नव्हे तर हजारो मुलांची माय बनते..
त्यांच्यासाठी शिक्षणाची मोट बांधते.स्वावलंबनाची कास धरते.तिच्या वक्षातला पान्हा मग सागर बनतो..प्रेमाचा
सिंधुसागर…..
सागर आटत नाही…
आज देहाने सिंधु अस्तित्वात नाही..
पण या सागरातल्या एकेका थेंबात तिचे अस्तित्व आहे…
बुडे तो सूर्य
ऊरे तो आभास..
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ…
आणि या आभाळमायेपुढे सदैव नतमस्तक…
एक प्रेममय ,सुखमय,शांतीमय समभावी समाज
निर्माण करण्याच्या निर्धाराचं सुगंधी फुल सिंधुचरणी वाहून श्रद्धांजली अर्पित….

राधिका भांडारकर पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा