सिंधुदुर्गनगरी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा करताना जिल्हा परिषदेच्यावतीने “उत्कर्षा” अंतर्गत २०१६-१७ पासून सुरू करण्यात आलेल्या मासिक पाळी व्यवस्थापनावर शिक्षक व विद्यार्थी यांनी तयार केलेले साहित्य संकलित करीत त्याचे ई-फ्लिप बुक तयार करण्यात आली आहे. त्याचे अनावरण जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्याहस्ते लॅपटॉपवर क्लिक करीत करण्यात आले.
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत व दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गांवकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, संतोष साटविलकर, सुधीर नकाशे, समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक स्मिता नलावडे यांच्यासह महिला कर्मचारी व समग्र शिक्षा अभियान कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन म्हणजे बालिका दिन या दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने राबविलेल्या “उत्कर्षा” या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या यशोगाथांचे ई-फ्लिप बुकचे विमोचन अध्यक्षा संजना सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. या फ्लिप बुकमध्ये २०१६-१७ पासून उत्कर्षा उपक्रम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षकांनी तयार केलेले मासिक पाळी व्यवस्थापनावरील साहित्य संकलित करून प्रसिद्ध करण्यात आले आहे.