You are currently viewing भारत….काल, आज आणि उद्या

भारत….काल, आज आणि उद्या

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा लेख

स्वातंत्र्याची ७५ री

भारत….काल, आज आणि उद्या

भारत… एकेकाळी जगातील गरीब देश म्हणून गणना होणारा आपला देश आज प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करतो आहे..स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात देशाची झालेली प्रगती खरोखरच लक्षणीय आहे.
परंतु…तरीही खरंच आवडतो का आपला प्रगत झालेला भारत? की अजूनही आस वाटते आहे आपल्या त्याच जुन्या भारत देशाची?

देशाच्या मातीशी इमान राखणारा आपला देशवासीय तेव्हा रहायचा मातीच्याच घरात….ज्या घराच्या भिंती असायच्या मातीच्या, त्यांचा गिलावा देखील मातीचाच अन रंग लागायचा तो देखील लाल गेरू (काव) म्हणजेच मातीचा…जमीन असायची ती सुद्धा मातीची….गोमतेच्या शेणाने लख्ख सारवलेली….चुन्याच्या वेलबुट्टीच्या रांगोळीने सजलेली…घासलेटच्या दिव्यांचा उजेड अन भिंतीला टेकून…मातीतून… बसल्यावर जमिनीतून मिळणारा गारवा म्हणजे फॅन आणि एसी पेक्षाही थंडावा द्यायचा.

स्टीलची भांडी ही आजची फॅशन…पण तेव्हा घरात अन्न शिजायचे ते मातीच्याच मडकीत….मातीतील पोषक घटक आपोआपच पोटात जायचे….रोग, कृमी, अगदी सर्दी पडसे देखील क्वचितच व्हायचे..मातीचेच ग्लास आणि मातीचेच पेले….जेवायला केळीची स्वच्छ पाने…अगदी आनंद मिळायचा त्या भाकरीच्या तुकड्याला मसाला आणि चटणीसोबत खाताना देखील.

डांबरी रस्ते नव्हते की एस ती गाड्या…ना नदीवर भले मोठे पूल….पण माणसे जोडलेली असायची जसा दोन किनारे जोडून ठेवायचा बांबूचा साकव तशीच…मनापासून घट्ट असायची नाती.
जमीन जायदाद इस्टेट किंचितही महत्व नव्हतं…जपली जायची ती नाती…सगेसोयरे आणि संबंध. लोक एक दुसऱ्यांच्या कामात उपयोगी पडायचे…माणुसकी जतन करायचे….घरात टीव्ही, मोबाईल नसायचे…त्यामुळे एकमेकांशी बोलून हसून खेळून सुखदुःख वाटून घ्यायचे…

शिक्षण घेणे हे गरिबीमुळे तसं शक्यच नसायचं….अंक समजले तरी ग्रॅज्युएट झाल्याचं फील येत असावं तेव्हा….शाळेत मुलं फिरकायचीच नाहीत…पोटासाठी शेती…एवढंच माहिती असायचं…बैलगाड्यांना जुंपलेल्या बैलांप्रमाणे राबवायचे…मातीत राबून मातीतच खपून जायचे…अंगाला लागलेली माती म्हणजे तसं श्रीमंतीचंच लक्षण…राबून शेत पिकवणारा म्हणजे मोठा शेतकरीच… आणि तोच श्रीमंत…
पैशाने श्रीमंत नसायचे पण मनाची श्रीमंती विपूल होती..घरात कमवून कोणी किती आणले याचा हिशोब नसायचा…पण दारावर आलेला प्रत्येक व्यक्ती, पाहुणा भरपेट जेवून तृप्तीचा ढेकर देऊन जायचा…

आज देश बदलला आहे…विज्ञानाचे युग आले…वैज्ञानिक क्रांती घडली..घराघरात मोठमोठ्या टीव्ही आल्या, लोकांनी विरंगुळ्यासाठी हळूहळू दुसऱ्यांच्या घरी जाणे सोडून दिले…रामायण, महाभारत म्हणता म्हणता सिरियलनी लोकांच्या मनाचा ठाव घेतला. गावात कधीतरी पडद्यावर दिसणारे सिनेमे घराघरात टीव्हीवर दिसू लागले…पण तरीही लोकांची नाळ अजूनही घट्ट जोडलेली होती…

पूर्वी गरिबीमुळे शिक्षणाकडे नसणारा ओढा दिसत होता, परंतु आता लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजू लागले…शिकल्याशिवाय प्रगती नाही…सरकारी नोकरी नाही…की प्रायव्हेट मध्येही शिक्षणाशिवाय कोणी उभे करत नसल्याची जाणीव होऊ लागली.. गावागावात एसटी गाड्या धावू लागल्या..दळणवळण साधने निर्माण झाली…मजबूत रस्ते आणि नद्यांवर पूल उभे राहिले…देश विदेशात विमानाने हवेत झेप घेत जाता येऊ लागले…अगदी जग मुठीत आले…स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्ध्या कपड्यात वावरणारा आता पॅन्ट शर्ट घालून साहेब बनला…घरात मौजमजेची, मनोरंजनाची….गृहपयोगी साधने आली…मातीची घरे जाऊन सिमेंटची जंगले उभी राहिली…लोक मातीचा थंडावा सोडून बंगल्यात घामाने भिजू लागले…परंतु प्रगती करायची म्हणजे… घाम गाळावाच लागणार या तत्वानुसार सिमेंटच्या घरात आरामदायी जीवनमान सुरू झाले…हॉटेलचं खाणं म्हणजे उच्चभ्रू जीवनशैली हा मापदंड बनला…आणि चांगल्या जीवांना आरामदायी जीवनशैली…मोठ्या प्रमाणावर प्रगती करून विपुल प्रमाणात शेती पिकविण्याच्या नादात रासायनिक खते पेरली गेली…त्यातूनच कॅन्सर सारखे महाभयंकर रोग मानवास जडू लागले…पृथ्वीतलावर आपल्यापेक्षा कोणीही सजीव हुशार नाही याचं घमेंडीत वावरत असलेल्या…अगदी चंद्रावरही आपले निशाण टोवून आलेल्या मानवाचे डोळ्यांनी देखील न दिसणाऱ्या कोरोनाच्या विषाणूने मात्र गर्वहरण केले….आणि आजही नवनवीन रूपे घेत करतो आहे.

मध्यंतरीच्या काळात भारत देशाने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली. कारखानदारी, उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. नवनवे तंत्रज्ञान भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले…राजीव गांधींनी जेव्हा भविष्याचा वेध घेत कॉम्प्युटर क्रांती केली तेव्हा लोकांनी त्यांना खरंतर वेड्यातच काढलं होतं, पण आज माणसाचे कोणतेही काम कॉम्प्युटर शिवाय होताना दिसत नाही… मोबाईलची एन्ट्री भारतीय बाजारात झाली आणि मोबाईल ने तर धुमाकुळच घातला…देश बिदेशात असणारे आपल्या आवडत्या, प्रिय व्यक्ती एका क्षणात आपल्याशी बोलू लागले..अगदी एका छोट्याशा मोबाईल फोन मुळे देश विदेशातील व्यक्ती नजरेसमोर दिसू लागली…सुख दुःखाची वाटणी देखील समोरासमोर होऊ लागली…बोलण्यासाठी…पाहण्यासाठी माणसे मोबाईल मुळे खूप जवळ आली, फेसबुक, व्हाट्सअप्प च्या माध्यमातून एकमेकांशी बोलू लागली…परंतु….

आजच्या युगात याच मोबाईल मुळे आपली सख्खी नाती….मित्र-मैत्रिणी जसे संपर्कामुळे जवळ आलेत तसे समोरासमोर असूनही…बाजूबाजूला बसून मात्र एकमेकांपासून दुरावलेत…

देशाने अतिशय चांगली प्रगती केली…ज्या देशाला गरीब म्हणून हिणवले जात होते, आज त्याच देशाकडे सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून पाहिले जात आहे. देशात बनलेल्या कोरोनासारख्या विषाणूवरच्या लस इतर देशांकडून मागणी होऊ लागल्या आहेत. भारतातील शास्त्रज्ञांना जगात मागणी वाढू लागली आहे. डेश आर्थिक तसेच सामाजिक पातळीवर बलाढ्य देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळे आजचा भारत देश म्हणजे स्वप्नातला भारत असल्यासारखे भास होऊ लागले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रगतीची आगगाडी धावू लागली आहे….यशाच्या बोटी तरंगू लागल्या आहेत…आशेची विमाने उड्डाण करून यशाकडे झेप घेत आहेत…..कोळसा…पेट्रोल…डिझेलवर धावणाऱ्या गाड्या आज रस्त्यावर इलेक्ट्रिक वर धावत आहेत…हवा, वायू आणि ध्वनी प्रदूषण दूर ठेवत नव्या युगाची नांदी देत आहेत…

उद्याचा भारत मात्र आज आपण स्वप्नातही विचार करू शकणार नाहीत एवढा प्रगत असेल ही मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे…
वाढलेल्या लोकसंख्येमुळे देश प्रगतीच्या वाटेवर चालून गेला…परंतु वेगाने पळू शकला नाही…*आम्ही दोघे आमचा एकच* असा नारा देत भविष्यातील युवक लोकसंख्येवर नियंत्रण तर ठेवेलच… परंतु प्रगतीची नवनवी दालने खुली करेल…बंद झालेली दारे ठोठावून….प्रगतीला वाट मोकळी करून देईल…आज चंद्रावर केवळ अभ्यास दौरे करणारे भारतीय भविष्यात चंद्रावर घरे बांधतील… आणि जगात भारत देशाला ताठ मानेने उभा ठेवतील….भारताकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला मान उंचच करून पहायला लावतील यात तिळमात्र शंका नाही…
भविष्यातील भारत सधन,प्रगत तर असेलच परंतु…..खऱ्या अर्थाने सुजलाम…सुफलाम…असेल हीच आशा मनास वाटते…

*जय हिंद….जय महाराष्ट्र…!!*

*©[दिपी]*✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग, ८४४६७४३१९६
२४/१२/२१

प्रतिक्रिया व्यक्त करा