कातकरी समाजाचा जिल्हाधिकारी, जि. प. अध्यक्षांना निवेदनाव्दारे इशारा
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमिहीन, बेघर, कातकरी आदिवासी समाजाचे पुनर्वसन करा. अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा कातकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, आणि जि प अध्यक्ष याना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या वतीने मालवण येथील नारायण पवार, उदय आईर यांनी आज जिल्हाधिकारी के मंजु लक्ष्मी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,महाराष्ट्र राज्याने आदिम जमात म्हणून घोषित केलेल्या कातकरी आदिवासीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आलेले नाही. त्यामुळे दरवर्षी या कातकरी आदिवासीना जंगलातल्या प्राण्याप्रमाणे मुसळधार पाऊस, वादळ, पूर याचा सामना करावा लागतो. नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते. इकडून -तिकडे स्थलांतरित होणाऱ्या या कातकरी कुटुंबांचा सर्वांगीन विकास व्हावा. यासाठी दरवर्षी जिल्हा, तालुका प्रशासनाजवळ वेळोवेळी पाठपुरावा केला जातो. दरवर्षी फॉर्म भरले जातात परंतु या कातकरी आदिवासी समाजाचे पुनर्वसन मात्र अद्याप करण्यात आलेले नाही. शासनाच्या प्रकल्पांना उद्योगाना तात्काळ जमिनी उपलब्ध करून दिल्या जातात.मात्र कातकरी आदिवासी समाजाला घर बांधण्यासाठी व त्याची पुनर्वसन करण्यासाठी जमिनी मिळत नाही. कातकरी समाज गेली १३ वर्षे जमीन व घरकूल मिळावे यासाठी संघर्ष करीत आहे. याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. कातकरी समाज कुठे राहतो, कसा राहतो,त्याना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते याचे शासकीय अधिकार्यांकडून कधीही सर्वेक्षण झालेले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ व १७ मे या दरम्यान झालेल्या तोक्ते वादळाने या कातकरी आदिवासींचे होत्याचे नव्हते करून टाकले. त्यांचे संसार उघड्यावर पडले. असे असूनही शासनाने याची दखल घेतलेली नाही. तरी कातकरी आदिवासी समाजाचे पुनर्वसन करा अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देणारे निवेदन आज जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष यांना कातकरी आदिवासी समाजाच्या वतीने नारायण पवार व उदय आईर यांनी दिले.