You are currently viewing शालेय क्रीडा स्पर्धेसाठी स्वतंत्र कोकण विभाग होण्यासाठी पाठपुरावा करू : राजेंद्र कोतकर

शालेय क्रीडा स्पर्धेसाठी स्वतंत्र कोकण विभाग होण्यासाठी पाठपुरावा करू : राजेंद्र कोतकर

सिंधुदुर्ग जिल्हा शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघाची आॅनलाईन सभा संपन्न

कासार्डे

द-या खो-यात राहणा-या आमच्या कोकणीतील खेळाडूंकडे प्रचंड नैसर्गिक क्षमता आहे. तरीही कोल्हापूर विभागीय शालेय स्पर्धेत आमचे खेळाडू मागे पाडतात, याठिकाणी असलेला सलग चार महिने पावसाळा, त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी फार कमी वेळ मिळत असल्याने त्यांचे राज्यस्तर खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहते, म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून समान भौगोलिक परिस्थिती असलेल्या कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा मिळुन शालेय क्रीडा स्पर्धेसाठी स्वतंत्र कोकण विभाग होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्यावतीने आयोजित आॅनलाईन सभेत जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी याप्रसंगी शारीरिक शिक्षण शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या बरोबरीने सातत्याने आपल्या विषयात अपडेट राहण्याचेही आवाहन करीत विषयासंबंधी सविस्तरपणे विवेचन केले.
या सभेला जिल्हाध्यक्ष बयाजी बूराण, सचिव दिनेश म्हाडगुत, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक विजयसिंह पोफळे, शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाहक तथा संघटनेचे सल्लागार संजय वेतुरेकर, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम समितीचे राज्य सदस्य शैलैश नाईक, जेष्ठ शिक्षक अच्यूत वणवे, चंद्रकांत काणकेकर यांच्यासह राज्य समन्वयक डी.जे. मारकड, आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनेश म्हाडगुत यांनी स्वागत करुन शासकीय स्तरावर संघटनेच्या माध्यमातून निवेदने, मिटींगा घेऊन केलेल्या पाठपुराव्या चा घोषवारा घेतला तर जिल्हा अध्यक्ष बयाजी बूराण यांनी संघटनेच्या कामांचा आढावा घेत विविध अभिनंदनाचे ठराव मांडले. तर राज्य समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी राज्य संघटनेच्या माध्यमातून झालेल्या विविध धोरणात्मक कामकाजाची माहिती सभेत दिली.
तर शैलैश नाईक यांनी इ.१ली ते इ.१२वी पर्यंत च्या अभ्यासक्रमा विषयी सविस्तर माहिती याप्रसंगी दिली.
यासभेत विविध विषयांवर झालेल्या चर्चेत विजयसिंह पोफळे, अच्यूत वनवे, हिराचंद तानवडे, बाळासाहेब ढेरे, दशरथ काळे, संजय पेंढुरकर, किशोर सोन्सुरकर, तुकाराम देवकर, उत्तरेश्वर लाड, संदेश तुळसणकर, मोहन सनगाळे, आदींनी सहभाग घेत आपले मनोगत व्यक्त केले.
या सभेला विविध तालुक्यातून मुख्या भाष्कर नादकर, माणिक पवार, संजय सावळ, समीर राऊत, महेंद्र वारंग, शाम वारंग, आनंदा जाधव, श्री.गुडेकर, अजितकुमार देठे, रविराज प्रधान, एकनाथ धनवटे, निलेश फोंडेकर, वैभव कोंडुस्कर, जयश्री. कसालकर, श्री.वाघमोडे, आदींसह अन्य शारीरिक शिक्षण शिक्षक उपस्थित होते.

तालुकास्तरावर शिक्षकांना पुरस्कार…

सिंधुदुर्ग जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाच्यावतीने आठही तालुक्यातून प्रतिवर्ष क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूची सर्वोच्च कामगिरी होणा-या शिक्षकांची गुणवेत्तेच्या आधारे ‘आदर्श क्रीडा शिक्षक’ व एका जेष्ठ शिक्षकाची ‘क्रीडा गौरव’ पुरस्कार देऊन संघटनेच्यावतीने सन्मानित करण्यात येईल असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.तसेच शालेय स्पर्धेतून राष्ट्रीयस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडुंचाही गुणगौरव करण्याचाही निर्णय यासभेत घेण्यात आला आहे.
या सभेला संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील ४५पेक्षा अधिक शारीरिक शिक्षण शिक्षक सहभागी झाले होते.
सभेचे सुत्रसंचलन मोहन सनागळे यांनी तर आभार हिराचंद तानवडे यांनी मानून सभेची सांगता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा