९६ पैकी ६७ जणांनी बजावला मतदानाचा हक्क; शांततेत मतदान प्रक्रिया सुरू…
वेंगुर्ले
तालुक्यात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. यात दुपारी १२ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले असून ९६ पैकी ६७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ही मतदान प्रक्रिया येथील तहसीलदार कार्यालयात सुरू आहे. मतदान स्थळी एका बुथवर महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते, तर दुसऱ्या बुथवर भाजपाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान याठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात ठेवण्यात आला आहे.
यावेळी मतदान केंद्राबाहेर भाजपचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते तर
महाविकास आघाडीचे शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब, उपजिल्हा प्रमुख बाळा दळवी, काँग्रेसचे दादा परब, उमेदवार विलास गावडे, उपसभापती सिद्धेश परब, प्रवक्ते इरशाद शेख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रज्ञा परब, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर आदींसह पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान आज झालेल्या मतदानामध्ये या निवडणुकीत सहकारी शेती पत पुरवठा विकास संस्थासाठी २३ पैकी २२ , नागरी सहकारी बँका पतसंस्थासठी १२ पैकी ९, पणन संस्थांसाठी ६ पैकी ३, औद्योगिक संस्था १७ पैकी १०, मच्छीमार संस्था १० पैकी ५, विणकर संस्थाठी १२ पैकी ८, इतर संस्था १६ पैकी १०, असे एकूण ६८ जणांनी मतदान केले आहे.