न्यायालयाकडून स्पष्टीकरण; जामीन मिळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह…
ओरोस
भाजप आमदार नितेश राणे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन दिवसांनी आज सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, निकाल देण्यासाठी वेळ हवा, असे सांगत न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी निकाल राखून ठेवला आहे. उद्या दिवसभरात केव्हाही हा निकाल जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही जामीन मिळणार की नाही ? याचे उत्तर मिळालेले नाही. त्यासाठी अजून एक दिवस वाट पहावी लागणार आहे.
१८ डिसेंबर रोजी कणकवली शहरातील नरडवे फाट्यावर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. त्यानंतर आणखी दोन व्यक्तींना अटक केली होती. यातील एका आरोपीला पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले होते. ती व्यक्ती सचिन सातपुते असून ते आ नितेश राणे यांचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यामुळे या प्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने आ नितेश राणे व संदेश सावंत यांनी २७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर २७ रोजी सुनावणी न होता ती २८ रोजी झाली. २८ रोजी सुनावणी पूर्ण न झाल्याने आज उर्वरित सुनावणी घेण्यात आली. परंतु सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करण्यास तब्बल साडेतीन ते चार तास घेतले. त्यानंतर आ राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. तोपर्यंत कार्यालयीन वेळ संपलेली होती. त्यामुळे जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी निकाल राखून ठेवला. उद्या निकाल देण्यात येईल असे सांगितले.